उत्तर प्रदेशातील परिस्थितीवर मोदी नाराज, योगींकडे केली विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 01:32 PM2018-04-09T13:32:30+5:302018-04-09T13:32:30+5:30
केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून
नवी दिल्ली - केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. अॅस्ट्रोसिटीवरील निकालावरून देशभरातील दलितांमध्ये वाढलेल्या नाराजीने भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचारणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये परिस्थितीती बिघडत का चालली आहे, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. त्याआधी योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी शाह यांनी काही मुद्द्यांवर उत्तर प्रदेश सरकारला आलेल्या अपयशावरून आदित्यनाथांकडे नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, 11 एप्रिलला अमित शाह लखनौला भेट देणार आहेत. त्यावेळी ते उत्तर प्रदेशमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरएसएसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यानंतर मोदी आणि शाह यांनी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील परिस्थितीबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.
योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील चर्चा ही नियमित चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पक्षांतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार या भेटीचा परिणाम लवकरच दिसणार असून, सरकार आणि संघटनेत काही बदल दिसून येणार आहेत. सपा आणि बसपा यांच्यातील एकीमुळे मुस्लिम आणि दलित मतांची भाजपाविरोधात एकजूट होण्याच्या शक्यतेवरून आरएसआरने भाजपाला इशारा दिला होता. त्यामुळे चिंता वाढलेल्या मोदी आणि अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते.