'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 08:29 AM2020-02-06T08:29:41+5:302020-02-06T08:50:55+5:30
शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार आहे. दरम्यान, या ट्रस्टला केंद्र सरकारमार्फत एक रुपयाचे दान देण्यात आले आहे. ट्रस्टला मिळालेले हे पहिले दान आहे.
केंद्र सरकारने 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला एक रूपया दान करण्याचे कारण म्हणजे ट्रस्ट अयोध्येतील राम मंदिर बांधण्याच्या दिशेने काम सुरू करू शकेल. केंद्र सरकारने हे दान गृह मंत्रालयाचे सचिव डी. मुर्मू यांच्यामार्फत दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रस्ट स्थावर मालमत्तेसह कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून दान, अनुदान, योगदान घेऊ शकते.
दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने 5 फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत 5 एकर जागा द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकारने काल 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. याचबरोबर, उत्तर प्रदेश सरकारने रामजन्मभूमीपासून 20 ते 25 किमी अंतरावर मुस्लिमांना मशिदीसाठी 5 एकर जमीन देण्याचे ठरविले आहे.
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' मधील 15 सदस्यांची नावे ...
1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील)
2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)
3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)
4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)
5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता)
6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)
7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)
8. कामेश्वर चौपाल (पटना)
9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या)
10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
12. केंद्राचा प्रतिनिधी
13. राज्याचा प्रतिनिधी
14. अयोध्येचे जिल्हाधिकारी
15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष
शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार
राममंदिराच्या शिलान्यासाला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकार निमंत्रण देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रस्ट स्थापन करण्याबाबत मोदी सरकारने डिसेंबरमध्येच मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. मात्र या ट्रस्टमध्ये राजकीय नेत्यांना सदस्य म्हणून घ्यायचे की नाही याबद्दल सरकारचा निर्णय होत नव्हता. ट्रस्ट कसा असावा याची रूपरेषा केंद्र सरकारने ठरविली आहे. यापूर्वी राममंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने बिहारचे तत्कालीन आमदार कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ केला होता. चौपाल हे दलित समाजातील व विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव होते.