मोदींनी घडवली नितीश-बायडन भेट, बिहारच्या राजकारणात खळबळ, PKनीं केली सूचक भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:29 PM2023-09-10T18:29:50+5:302023-09-10T18:31:31+5:30
prashant Kishor: ९ आणि १० सप्टेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० शिखर परिषदेचा आज औपचारिक समारोप झाला. मात्र या परिषदेदरम्यान, घडलेल्या काही घटना आता देशाच्या तसेच जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत.
९ आणि १० सप्टेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० शिखर परिषदेचा आज औपचारिक समारोप झाला. मात्र या परिषदेदरम्यान, घडलेल्या काही घटना आता देशाच्या तसेच जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी भेट घालून दिल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बऱ्याच काळानंतरी जी-२० बैठकीतील मेजवानीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांची भेट झाली होती. दरम्यान, राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्याबाबत सूचक भविष्यवाणी केली आहे. बिहारमधील पुढील दोन्ही निवडणुका ह्या राज्यात आज जी व्यवस्था आहेत. तिच्या आधारावर होणार नाहीत, अशा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्रांध्यक्षांसोबत घडवून आणलेल्या भेटीनंतर प्रशांत किशोर म्हणाले की, पुढील निवडणुका कधी होतील माहिती नाही मात्र बिहारमध्ये आज जी व्यवस्था आहे. त्यानुसार होणार नाहीत. कुठला नेता, कुठला पक्ष कुठल्या दिशेने पळेल हे काही सांगता येत नाही. आज जी व्यवस्था आहे, त्यामध्ये सात पक्ष एकत्र झालेले आहेत. पुढच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही यामध्ये मोठं परिवर्तन झालेलं पाहाल. याची झलक तुम्हाला दिसत असेलच.
प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, महाआघाडीला २०१५ मध्ये आम्हीच आकार दिला होता. त्यामुळे ती बनवण्यामध्ये तसेच चालवण्यामध्ये अडचणी काय आहेत, हे मला माहिती आहे. २०१५ मध्ये तीन पक्षांची जी आघाडी मी बनवली होती, ती आज सात पक्षांची झाली आहे. २०१५ मधील त्या महाआघाडीतील लालू प्रसाद यादव किती वेळा भेटले होते? नितीश कुमार यांनी महाआघाडी का बनवली होती, हे समजून घेण्याची गरज आहे. ते मला दिल्लीत भेटले होते. तिथे त्यांनी स्वत: मला महाआघाडी बनवण्यास आणि त्यामध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी जे विधान केलं आहे. त्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे खूप घाईचं ठरेल. मात्र डिनरमध्ये नितीश कुमार यांनी सहभागी होणं. तसेच मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील भेटीमुळे बिहारमधील राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.