"मोदी बाबू, बंगाल जळाला तर दिल्लीच्या खुर्चीला हादरे बसतील", ममता बॅनर्जींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:04 PM2024-08-29T12:04:55+5:302024-08-29T12:05:38+5:30
Mamata Banerjee Warns Narendra Modi: काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून, विरोधकांकडून ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच या घटनेविरोधात काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपाने पुकारलेल्या भारत बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीवरून ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांना वाटतंय की हा बांगलादेश आहे. मला बांगलादेश आवडतो, तिथले लोक आमच्यासारखंच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. मात्र बांगलादेश हा वेगळा देश आहे आणि भारत हा वेगळा देश आहे, हे लक्षात ठेवा. मोदी बाबू तुम्ही तुमच्या पक्षाला सांगून आग लावत आहात. लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर आसाम गप्प बसणार नाही. पूर्वोत्तरेतील राज्यही शांत राहणार नाहीत. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशाही शांत राहणार नाही. दिल्लीसुद्धा शांत राहणार नाही. तुमची खुर्ची हलवून टाकू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी आयोजित एका सभेमध्ये केलं. ममता बॅनर्जींच्या विधानानंतर बंगालमधील वातावरण तापलं आहे. तसेच भाजपाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
बदला नाही तर बदलाची आपली जुनी घोषणा विसरून ममता बॅनर्जी ह्या विरोधी पक्षांना धमकावण्याचं काम करत आहेत, असा आरोप भाजपाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुकांत मुजुमदार यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान धमकीपूर्ण असल्याची टीका करत त्याचा निषेध केला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून ममता बॅनर्जी ह्या महत्त्वाच्या पदावर राहण्यासाठी पात्र राहिल्या नसल्याचे सांगितले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विधानावर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही टीका केली.