ब्रिक्स परिषदेनंतर मोदी जाणार म्यानमारला; रोहिंग्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान चर्चा करणार का ?
By अोंकार करंबेळकर | Published: September 2, 2017 12:16 PM2017-09-02T12:16:58+5:302017-09-02T15:45:51+5:30
गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.
मुंबई, दि २- गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे. देशात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवशनात माहिती दिली होती. या रोहिंग्यांना माघारी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र सरकारच्या या कल्पनेवर भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी टीका केली होती. हैदराबाद येथे राहणाऱ्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा परंतु परत मायदेशी पाठवू नका अशी विनंती केली आहे.
गेल्या आठवडाभरात रखाइन प्रांतातील रोहिंग्या, रखाइन, बौद्ध व हिंदू या सर्वांचे जीवन विस्कळीत झाले आहे. येथे निर्माण झालेल्या तणावात ४०० लोकांचे प्राण गेले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या बळावर रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलण्याच्या प्रक्रियेवर संपूर्ण जगाने टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राने आंग सान सू ची यांच्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहिंग्यांचा मुद्दा चर्चेमध्ये उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान ६ आणि ७ सप्टेंबर असे दोन दिवस म्यानमार दौऱ्यावर असतील. राजधानी नायपीडाँवमध्ये भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
रोहिंग्यांचा प्रश्न नक्की आहे तरी काय ?
2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध रखाईन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील अशी भिती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशिररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरुच आहे.