केंद्रीय मंत्रिमंडळाची विश्वकर्मा योजनेला मंजुरी, मोदींच्या घोषणेनंतर २४ तासांत निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:38 PM2023-08-16T15:38:43+5:302023-08-16T15:39:30+5:30
सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ही योजना सुरू केली जाणार आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर २४ तासांच्या आत केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ही योजना सुरू केली जाणार आहे.
सोनार, गवंडी, नाई, लोहार यासारख्या काम करणाऱ्या लोकांना मदत करणे हा केंद्राच्या या योजनेचा उद्देश आहे. लाल किल्ल्यावरून घोषणा करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सुरुवातीला ही योजना १५,००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केली जाईल आणि नंतर ती वाढवली जाईल. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचा उद्देश या वर्गाला प्रशिक्षण आणि साधने उपलब्ध करून देणे हा असणार आहे. तसेच, विश्वकर्मा योजना सुरू केल्यानंतर केंद्र सरकार या योजनेची सविस्तर माहिती देईल.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना महत्त्वाच्या घोषणा केल्या. विश्वकर्मा योजनेशिवाय नरेंद्र मोदींनी 'लखपती दीदी' बद्दलही घोषणा केली होती. २ कोटी लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, या माध्यमातून ग्रामीण महिलांना ड्रोन चालवण्याचे व वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, त्याचा मुख्य वापर कृषी क्षेत्रात होईल, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली होती.
या योजनेशिवाय मध्यमवर्गीय लोकांसाठी गृहकर्जाच्या व्याजात काही प्रमाणात सवलत देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते. शहरात राहणाऱ्या, अनधिकृत वसाहतींमध्ये राहणारे आणि शहरात स्वत:चे घर बांधू इच्छिणाऱ्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. लवकरच या योजनेशी संबंधित माहितीही शेअर केली जाईल.