बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:47 PM2024-10-24T18:47:07+5:302024-10-24T18:48:58+5:30

बिहार, आंध्र प्रदेशला मोदी सरकारने मोठी भेट दिली असून पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलीय

Modi cabinet approves two railway projects worth 6798 crores Bihar and Andhra will benefit | बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

PM Modi Cabinet Approves New Rail Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांचाही समावेश आहे, ज्याचा फायदा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहारला होणार आहे. या रेल्वे प्रकल्पांवर ६,७९८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीआधीच आंध्र प्रदेश आणि बिहारला मोठं गिफ्ट दिलं आहे. लोकसभा निकालानंतर एनडीएच्या सत्ता स्थापनेत या दोन्ही राज्यांचा मोठा वाटा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. एक आंध्र प्रदेशातील अमरावती आणि दुसरा उत्तर बिहारला ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा. ६,७९८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे उद्दिष्ट आहे, जे एकूण ३१३ किलोमीटरचे असणार आहे. यासोबतच मंत्रिमंडळात आज एकूण ९,१७,७९१ कोटी रुपयांच्या सात क्षेत्रातील प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ, बंदर, महामार्ग, रेल्वे, मेट्रो, औद्योगिक आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. रेल्वेसाठी ५१,८०१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण १२ रेल्वे प्रकल्प आणि वाराणसीतील एका नवीन पुलाचा समावेश आहे.

पहिला प्रकल्प, ८७ किमी लांबीचा, अमरावती रेल्वे मार्ग आहे, ज्याची अंदाजे किंमत २,२४५ कोटी रुपये आहे. हा नवीन रेल्वे मार्ग हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांना थेट रेल्वे मार्गाने जोडेल. तसेच मछलीपट्टणम, कृष्णपट्टणम आणि काकीनाडा या बंदरांना जोडला जाणार आहे. तर दुसरा प्रकल्पामुळे उत्तर बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमधील प्रवास सुखकर होणार आहे. ४,५५३ कोटी रुपये खर्चाच्या या दुहेरी मार्गाच्या रेल्वे मार्गावर ४० हून अधिक पूल असतील. सुधारित पायाभूत सुविधांमुळे लोक, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुलभ होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडींच्या समितीने दोन्ही प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यांची किंमत अंदाजे ६,७८९ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेले हे प्रकल्प भारतीय रेल्वेचे जाळे अंदाजे ३१३ किलोमीटरने वाढवतील.

नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे १६८ गावांना जोडेल आणि नऊ नवीन स्थानकांसह सुमारे १२ लाख लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सीतामढी आणि मुझफ्फरपूर या दोन्ही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच यामुळे सुमारे ३८८ गावे आणि सुमारे नऊ लाख लोकांना याचा फायदा होईल. कृषी उत्पादने, खते, कोळसा, लोखंड, पोलाद आणि सिमेंट यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे मार्ग महत्त्वाचे आहेत.
 

Web Title: Modi cabinet approves two railway projects worth 6798 crores Bihar and Andhra will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.