मोदी मंत्रिमंडळाची बैठक संपली; उद्या नव्या संसदेत काम, विरोधक तिथेही गोंधळ घालणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 09:58 PM2023-09-18T21:58:34+5:302023-09-18T21:59:08+5:30
मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. जवळपास दीड तास ही बैठक सुरु होती.
संसदेच्या विशेष सत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली मंत्रिमंडळ बैठक संपली आहे. ही बैठक सायंकाळी साडेसहाला सुरु झाली होती. आज जुन्या संसदेत कामकाज झाले. यावेळी सर्व नेत्यांनी आठवणींना उजाळा दिला. आता उद्यापासून नवीन संसदेत कामकाज सुरु होणार आहे. उद्याचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे.
मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. जवळपास दीड तास ही बैठक सुरु होती. पंतप्रधान मोदी उद्या संविधानाची प्रत घेऊन सेंट्रल हॉलपासून संसदेच्या नवीन इमारतीपर्यंत चालत जाणार असल्याचे समजते आहे.
सोमवारी सकाळी झालेल्या इंडिया अलायन्सच्या बैठकीत संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनादरम्यान पक्षांमधील समन्वय सुरू ठेवण्याचा आणि महागाई, बेरोजगारी, मणिपूर हिंसाचार आणि सीमेवरील चिनी अतिक्रमण या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नव्या संसदेतही तोच गोंधळ पहायला मिळणार आहे.
अदानींच्या कंपन्या, शेतकरी संकट, देशातील आर्थिक परिस्थिती आणि जात जनगणना या मुद्द्यांवर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होऊ देण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीने सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.