देशात 900 ठिकाणी मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीचा उत्सवी सोहळा

By admin | Published: May 10, 2017 08:46 PM2017-05-10T20:46:59+5:302017-05-10T20:46:59+5:30

मोदी सरकारचा 3 वर्षांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत असल्याने देशातल्या 900 ठिकाणी तो धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे

Modi celebrates 3 years of celebration of Modi government in 900 countries | देशात 900 ठिकाणी मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीचा उत्सवी सोहळा

देशात 900 ठिकाणी मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीचा उत्सवी सोहळा

Next

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - मोदी सरकारचा 3 वर्षांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत असल्याने देशातल्या 900 ठिकाणी तो धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. या तमाम सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी 74 केंद्रीय मंत्र्यांना देशभर पाठवले जाणार असून, त्याची सारी जबाबदारी मुख्यत्वे भाजपाचे आमदार आणि खासदारांवर सोपवण्यात आली आहे. केंद्रातल्या एनडीए सरकारचा उल्लेख पहिल्या दिवसापासून मोदी सरकार असाच होत असल्याने सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त सलग 20 दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सारे केंद्रीकरणही ब्रँड मोदीभोवतीच आहे. पंतप्रधान मोदी देशातल्या पाच प्रमुख सोहळ्यांचे नेतृत्व स्वत: करणार असून, पहिला सोहळा आसाममध्ये संपन्न होणार आहे.

सरकारच्या कार्यशैलीचे वर्णन करण्यासाठी पंतप्रधानांच्या व्यक्तिगत पत्राच्या 2 कोटी प्रती या निमित्ताने तयार करण्यात आल्या आहेत. देशातल्या अधिकाधिक लोकांपर्यंत, विशेषत: सरकारी योजनांच्या लाभार्थींपर्यंत त्या 26 मेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी 20 मे रोजीच ही पत्रे पोस्ट केली जाणार आहेत. याखेरीज मोबाईल धारकांना 10 कोटी एसएमएसद्वारे पंतप्रधानाच्या न्यू इंडिया संकल्पनेचा संदेश पाठवला जाणार आहे. घराघरात मोदींचे नाव पोहोचावे, हा त्यामागचा उद्देश आहे.

‘मोदी फेस्टिव्हल’ नावाने तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त ‘मेकिंग अँड डेव्हलपिंग इंडिया’ फेस्टिव्हल देशभर ठिकठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. याच्या जोडीला भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकाऱ्यांच्या उपस्थितीत, राज्यांच्या राजधानीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, मोदी सरकारच्या विविध उपक्रमांबरोबरच राज्य सरकारने राबवलेले प्रमुख कार्यक्रम व त्याला मिळालेले यश यांचे भव्य सादरीकरण त्यात केले जाईल. विविध कल्याणकारी योजनांची रंगीबेरंगी पत्रके व पंतप्रधानांच्या स्वप्नांकित घोषणा रंगवलेल्या टोप्याही यावेळी वाटल्या जाणार आहेत.

गतवर्षी मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण केली, त्यावेळी कार्यक्रमाचे घोषवाक्य ‘मेरा देश बदल रहा है’ होते मात्र यंदाच्या कार्यक्रमांसारखा मोठा धुमधडाका त्यावेळी नव्हता, याचे मुख्य कारण बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा तेव्हा नुकताच धुव्वा उडाला होता. यंदा मात्र भाजपला उत्तरप्रदेश, उत्तराखंडाच्या निवडणुकीतील नेत्रदीपक यश मिळाले. गोवा आणि मणिपुरात भाजपचे सरकार स्थापन झाले. देशभर विरोधकांनी नोटबंदीसारख्या वादग्रस्त विषयाबाबत गदारोळ उठवला असतांनाही जनतेचे व्यापक जनसमर्थन नोटबंदीच्या निर्णयाला प्राप्त झाले, यामुळे सत्ताधारी भाजपमधे प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्साह ठिकठिकाणी उत्सवी स्वरूपात साजरा करण्याचे पक्षाने ठरवले आहे.
पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी राजधानी दिल्लीत 27 आणि 28 मे रोजी केंद्रीय मंत्र्यांचे विविध गट पत्र परिषदांबरोबर वार्तालापाचे कार्यक्रम आयोजित करणार आहेत. देशातल्या ज्या 900 ठिकाणी हे केंद्रीय मंत्री विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जातील, तिथे महिला, तरूण पिढी, शेतकरी, दलित व मागासवर्गियांशी त्यांचा संवाद घडवणारे कार्यक्रम होतील. याखेरीज प्रमुख महाविद्यालये, आयआयटी व आयआयएम साख्या प्रमुख शिक्षण संस्थांमधेही हे मंत्री जातील. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या उज्वल भवितव्याबाबत हितगुज करतील. याखेरीज ग्रामीण भागातल्या अशा गावात या मंत्र्यांना एक पूर्ण दिवस व्यतित करावा लागेल, ज्याचे विद्युतीकरण अलीकडेच झाले आहे. या विद्युतीकरणामुळे ज्यांनी आपल्या घरात प्रथमच वीजेचा प्रकाश पाहिला अशा कुटुंबाबरोबर सकाळचा नाश्ता अथवा दुपारचे भोजन हे मंत्री ग्रहण करतील. मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीत भारतात नेमके कोणते परिवर्तन झाले, याची जाणीव देशातल्या मतदारांना करून देण्यासाठी हिंदीसह विविध भाषांमधे ‘अब और तब’ शीर्षकाची पुस्तिका वाटली जाईल. युपीए सरकारची 10 वर्षे आणि मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीची तुलना त्यात केलेली असेल.

Web Title: Modi celebrates 3 years of celebration of Modi government in 900 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.