''मोदींना खुलं आव्हान! हार्दिक पटेलविरोधात जिंकून दाखवा, राजकारण सोडेल''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 09:45 PM2017-12-25T21:45:53+5:302017-12-25T21:58:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन
मुंबई: गुजरातमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकणारे युवा नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले आव्हान दिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हार्दिक पटेलविरोधात निवडणूक जिंकून दाखवावी. जर नरेंद्र मोदी जिंकले तर मी राजकारण सोडून देईन असं वक्तव्य जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे.
इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाऊवर यंदाच्या गुजरात निवडणुकांवर आपली खास छाप पाडणारे तीन तरूण नेते हार्दिक पटेल,अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांची मुलाखत सुरू होती. या दरम्यान या तिघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या धोरणांवर टीका केली. मुलाखती दरम्यान महिला अॅंकरने भविष्यातील राजकारणाविषयी विचारणा केली. त्यावर गुजरात निवडणूक ही तर केवळ सुरूवात आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी भाजपासारख्या फॅसिस्ट शक्तींविरोधात प्रचार करू असं उत्तर तिघांनी दिलं.
त्यानंतर महिला एंकरने, तुम्ही पंतप्रधानांना टक्कर देऊ शकतात असं वाटतं का? हा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं आव्हान दिलं. पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन असं खुलं आव्हान जिग्नेश मेवाणी यांनी दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच जिग्नेश मेवाणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय झाले आहे त्यांनी लवकरच राजकारणातून संन्यास घ्यावा अशी खोचक टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय झाले आहे त्यांनी लवकरच राजकारणातून संन्यास घ्यावा अशी खोचक टीका काही दिवसांपूर्वीच जिग्नेश मेवाणीने केली होती. त्यानंतर मोठा वाद उफाळला होता. भाजपाने हे विधान म्हणजे पंतप्रधानांचा अपमान असल्याचं म्हणत माफी मागावी अशी मागणी केली होती.