कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:28 PM2024-11-04T20:28:22+5:302024-11-04T20:28:58+5:30
भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांवरून तणाव वाढत चालला आहे. या घटनेमुळे कॅनडातील हिंदूंमध्ये संताप वाढत आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे. अशाने भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही, अशा शब्दांत मोदींनी निषेध व्यक्त केला आहे.
आम्ही कॅनडा सरकारने न्याय सुनिश्चित करणे आणि कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा करतो, असेही मोदी म्हणाले. ब्रॅम्प्टन, ओंटारियो येथील हिंदू सभा मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी हिंसाचार केला होता. भारतीय नागरिकांना मारहाण करण्यात आली होती. खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला होता. या घटनेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंदिरात हिंसाचाराच्या घटना अस्वीकार्य असल्याचे म्हटले होते.
भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांवरून तणाव वाढत चालला आहे. या घटनेमुळे कॅनडातील हिंदूंमध्ये संताप वाढत आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने या घटनेनंतर ''बटोगे तो कटोगे'' ची घोषणा दिली आहे. महत्वाचे म्हणजे अशीच घोषणा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तर मोदींनीही याच संदर्भात वक्तव्य केले होते.