बिहारमध्ये याआधी आलेली पूरस्थिती मोदींना महत्त्वाची वाटली नाही- लालू प्रसाद यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 03:10 PM2017-08-26T15:10:36+5:302017-08-26T15:13:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल (राजद) चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली, दि. 26- मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या भागाची हवाई पाहणी केली. हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे.
'यापूर्वीही बिहारमध्ये अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली पण, त्यावेळी मोदींना ती महत्वाची वाटली नाही. एखाद्या छोट्या होडीमधूनही त्यांनी कुठल्याही ठिकाणाला भेटही दिली नाही, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. बिहारमध्ये पूर आलेला नाही, तर आणला गेला आहे. नीतिशकुमार सरकारच्या इंजिनिअरने धरण फोडून हा पूर आणला आहे' असा घणाघाती आरोपही लालू प्रसाद यादव यांनी नीतिशकुमार यांच्यावर केला. त्याचबरोबर पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा फक्त ड्रामा असल्याची टीकाही त्यांनीही लालू प्रसाद यांनी केली आहे.
Bihar mein baadh aaya nahi baadh laya gaya, Nitish ka engineer baandh (dam) kaat ke baadh le aaya: RJD Chief Lalu Prasad Yadav #BiharFloodspic.twitter.com/dRJIm497yf
— ANI (@ANI) August 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदीही त्यांच्यासोबत होते. हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बिहारला आवश्यक ते सर्व सहकार्य करु तसंच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रातून पथक पाठवण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.
बिहारमधल्या या पूरामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. मागच्या काही दिवसात आसाम, बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालला पूराचा मोठा फटका बसला आहे. आसाममध्ये २१ जिल्ह्यातील २२.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला यामध्ये 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी केली हवाई पाहणी
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोण्डा, श्रावस्ती, बलरामपुर बहराइच जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील मदत कार्यात हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. बहराइचमध्ये ऐरिया गावात त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कर्नलगंजमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या दोन नागरिकांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपये दिले.