विधानसभेसाठीचे मतदान हा मोदींना कौल नव्हे, मुख्यमंत्री रमणसिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:08 AM2018-11-07T05:08:57+5:302018-11-07T05:09:30+5:30

छत्तीसगढमधील मतदार विधानसभेसाठी मतदान करणार असल्याने यातील निकालांकडे मोदींना पाठिंबा वा मोदींना विरोध असे पाहून चालणार नाही.

Modi does not vote for assembly polls, Chief Minister Raman Singh | विधानसभेसाठीचे मतदान हा मोदींना कौल नव्हे, मुख्यमंत्री रमणसिंग

विधानसभेसाठीचे मतदान हा मोदींना कौल नव्हे, मुख्यमंत्री रमणसिंग

Next

रायपूर - छत्तीसगढमधील मतदार विधानसभेसाठी मतदान करणार असल्याने यातील निकालांकडे मोदींना पाठिंबा वा मोदींना विरोध असे पाहून चालणार नाही. अर्थात या निवडणुकांत भाजपलाच बहुमत मिळेल, असे सांगून, लोकसभा निवडणुकांवर या निवडणुकांचा काहीसा परिणाम होणे शक्य आहे, असे प्रतिपादन छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी येथे केले.
विधानसभेसाठी मतदान होत आहे. मोदी हे काही इथे उमेदवार नाहीत. त्यामुळे मतदानाचा कौल मोदींच्या बाजूने वा विरोधी असे पाहून चालणार नाही, असे रमणसिंग यांचे म्हणणे आहे. रमणसिंग सलग १५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असून, भाजपाला यंदा पराभूत करण्यासाठी काँग्रेसने सारी ताकद तिथे लावली आहे. आतापर्यंतच्या विविध सर्वेक्षणांतूनही भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही, असेच निष्कर्ष आले आहेत.
या पार्श्वभूमीवर रमणसिंग यांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला. मायावती यांचा बसपा व अजित जोगी यांचा जनता काँग्रेस, छत्तीसगड यांच्या आघाडीचा फटका काँग्रेसला बसेल, असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र राज्यात सरकारविरोधात वातावरण असून, त्याचा फायदा आम्हाला मिळेल, असे काँग्रेसचे नेते करीत आहेत. आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्ज माफ करू, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
राज्यात विधानसभेच्या ८0 जागा आहेत. त्यापैकी १८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी, तर उरलेल्या ७२ जागांसाठी २0 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत भाजपला ४९ तर काँग्रेसला ३९ जागा मिळाल्या होत्या.

बस्तरमध्ये प्रचारही त्रासदायक
राज्यातील बस्तरचा भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. बस्तरमध्ये बीजापूर, दंतेवाडा, कोंटा, चित्रकुट, नारायणपूर, बस्तर, जगदलपूर, कानकेर, केशकल, कोंडागाव, अंतगढ, भानुप्रतापपूर असे १२ मतदारसंघ आहेत. या भागात माओवाद्यांचा प्रभाव आहे. काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांसाठी हा भाग रेड झोन म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकांत बस्तर विभागातील १२ पैकी ८ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.
इथे प्रचार करणे राजकीय कार्यकर्त्यांना अवघड होत असले तरी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. या भागाचा अजिबात विकास झाला नसल्याने काँग्रेसने तोच मुद्दा तिथे पुढे केला आहे.

विधानसभेच्या ९0 जागांसाठी १२९१ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ जागांसाठी १९0, तर दुसºया टप्प्यातील ७८ जागांसाठी ११0१ जणांनी अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यात माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातच मतदान होईल. राज्यातील ९0 पैकी १0 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, २९ अनुसूचित जमातींसाठी आणि ५१ खुले मतदारसंघ आहेत. एक कोटी ८५ लाख इतके मतदार आहेत.

Web Title: Modi does not vote for assembly polls, Chief Minister Raman Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.