26 मे पासून देशात साजरा होणार "मोदी फेस्टिव्हल"
By admin | Published: May 16, 2017 02:13 PM2017-05-16T14:13:02+5:302017-05-16T14:13:02+5:30
भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन तीनवर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात "मोदी फेस्टिव्हल" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन तीनवर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात "मोदी फेस्टिव्हल" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 26 मे पासून सुरु होणारा हा फेस्टिव्हल तीन आठवडे चालणार आहे. देशातील 125 जिल्ह्यांमध्ये हा फेस्टिव्हल साजरा होणार असून, या माध्यमातून विकासाचा अजेंडा आणि मोदी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.
मागची निवडणूक आम्ही लोकांमध्ये आशावाद, अपेक्षा निर्माण करुन जिंकली. पुढच्या निवडणुकीत आम्ही काय कामे केली, किती आश्वासने पूर्ण केली ते घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. हा फेस्टिव्हल त्या योजनेचाच एक भाग आहे असे एका भाजपा नेत्याने सांगितले. या नेत्यावर फेस्टिव्हलसाठी प्रदेश भाजपाबरोबर समन्वय साधण्याची जबाबदारी आहे.
या फेस्टिव्हलमध्ये विविध सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोदी सरकारने घेतलेल्या वेगवेगळया धोरणात्मक निर्णयावर चर्चा होईल. एकूणच सरकारच्या कामकाजाचे मुल्यमापन होईल. जूनच्या मध्यापर्यंत हा फेस्टिव्हल चालणार आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून भाजपा ज्या भागांमध्ये मर्यादीत आहे तिथे पक्ष विस्ताराचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला तीनवर्ष पूर्ण होतील. मोदी स्वत: त्या दिवशी गुवहाटीला जाणार आहेत. मोदींच्या गुवहाटी दौ-यात या फेस्टिव्हलचा शुभारंभ होईल.
त्यानंतर मोदी स्वत: दिल्ली, पुणे, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर या शहरांमध्ये जाऊन आपल्या सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडतील. येत्या 25 मे पासून ते न्यू इंडिया नावाची एक मोहिमही सुरु करणार आहेत.