निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झालेले मोदी पहिले नेते – अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:08 PM2019-05-27T15:08:11+5:302019-05-27T15:08:54+5:30
जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना अनुभव नव्हता. मोदींनी पद स्वीकारलं, त्यानंतर तीनवेळा ते मुख्यमंत्री झाले.
वाराणसी – नरेंद्र मोदी या देशाचे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी पंचायत समितीची निवडणूकही लढवली नाही आणि मुख्यमंत्री झाले असं कौतुक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वाराणसी येथे रॅलीला संबोधित करताना सांगितले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अमित शहा यांनी वाराणसीत कार्यकर्त्यांचे आभार मानले. काशीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला असंही शहा म्हणाले.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, वाराणसी लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरण्याआधी काशी दर्शन, रोड शो, गंगा आरती असे कार्यक्रम झाले. यावेळी रोड शोमध्ये प्रचंड प्रमाणात जनतेचा पाठिंबा मोदींना मिळाला. त्याचवेळी निश्चित झालं होतं की वाराणसीच्या निकालांमध्ये मोदींचा विजय पक्का आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना अनुभव नव्हता. मोदींनी पद स्वीकारलं, त्यानंतर तीनवेळा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना प्रसिद्धी मिळाली असं त्यांनी सांगितले.
तसेच २०१४ च्या आधीची काशी आणि आत्ताची काशी यात किती अंतर आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी निवडणूक असेल ज्यात उमेदवार नामांकन अर्ज भरल्यानंतर तेथील जनतेवर विश्वास ठेवून देशात प्रचाराला निघाला. तुम्ही मोदींवर विश्वास ठेवला. नरेंद्र मोदींसारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला हे तुमचं भाग्य आहे. मोदी मणिनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले नंतर मुख्यमंत्री झाले. ज्यावेळी त्यांनी पद सोडले तेव्हा मणिनगर देशातील विकसित विधानसभा मतदारसंघ बनला होता असं अमित शहा यांनी वाराणसीच्या जनतेला सांगितले.
दरम्यान गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत गंगा घाट, एअरपोर्टपासून काशी रोड, जमिनीखालून विद्युत तारा घालण्याचे काम अशाप्रकारे नियोजनबद्ध काशीचा विकास होत आहे. आज तुम्ही उत्तर प्रदेश सरकारचे विकासाचे आकडे बघा, भाजपाचा जाहीरनामा बघा, भाजपाने जी जी आश्वासनं दिली ती ती पूर्ण केली असल्याचा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी, अमित शहा वाराणसी येथे गेले होते. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल ३ लाख ८५ हजार मतांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला. मागील वेळीही नरेंद्र मोदींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.