Karnataka Assembly Elections 2018 : मोदी-गांधी यांच्यात रंगले वाक्युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:19 AM2018-05-04T05:19:54+5:302018-05-04T05:19:54+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राज्यात जोरदार सभा सुरू आहेत.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राज्यात जोरदार सभा सुरू आहेत. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.
मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारचे वर्णन ‘सिद्ध रूपया सरकार’ असे केले. मोदी म्हणाले की, तुमचा उत्साह व जोश आता काँग्रेसचे कर्नाटकातील सरकार जाणार हे सिद्ध करीत आहे. सिद्धरामय्यांनी राज्याला कर्जबाजारी करून टाकले त्यामुळे लोक आता त्यांना सहन करणार नाहीत.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला प्रगती पुस्तकावर शेतीच्या विषयात ‘फ’ वर्ग दिला. शेतकऱ्यांना काँग्रेसच्या राज्य सरकारने ८,५०० कोटींची कर्ज माफी दिली परंतु केंद्राचे त्यात काहीही योगदान नाही, असे गांधी टिष्ट्वटरवर म्हणाले. मोदी हे माझ्यावर कशीही टीका करू शकतात परंतु मी वैयक्तिक शेरेबाजी करणार नाही, असे गांधी म्हणाले. प्रचारसभेत गांधी म्हणाले की, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना (राफेल विमान खरेदी, फरार नीरव मोदी) मोदी उत्तरे देत नाहीत तर फक्त माझ्यावर वैयक्तीक हल्ले करतात. मोदी प्रचारात म्हणाले होते की राहुल गांधी यांनी माझ्याबद्दल काहीही खरे-खोटे बोलावे त्यामुळे मला काही फरक पडत नाही.
वोक्कालिगांच्या मतांचे ध्रुवीकरण?
बंगळुरू : जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. देवेगौडा यांची पंतप्रधान मोदी यांनी अनपेक्षितपणे प्रशंसा केल्याने कर्नाटकात जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती ही की, काँग्रेसला मिळणारी वोक्कालिगांची मते यामुळे दूर जाऊ शकतात. देवेगौडा यांची मोदीस्तुती ही भाजपा-जनता दल (एस) मैत्री असल्याचे बोलले जात आहे.
‘देवेगौडांचा अनादर केलेला नाही’
बंगळुरू : एच. डी. देवेगौडा यांच्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कधी आदर व्यक्त केला नाही हा मोदी यांचा दावा निराधार आहे. वास्तविक मोदी यांनीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व गौडा यांचा सन्मान राखला नाही. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी मांडले.