मोदींनी दिला नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 03:34 PM2019-01-03T15:34:08+5:302019-01-03T15:35:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जालंधर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांना प्रदीर्घ मुलाखत दिल्यानंतर आज पंजाबमधून मोदींनी आपल्या प्रचार अभियानास सुरुवात केली आहे. दरम्यान, जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंडियन सायन्स काँग्रेसचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला.
यावेळी मोदी म्हणाले की, ''शेकडो वर्षांपासून संशोधक जे संशोधन करत आहेत. त्याचा फायदा देशाला मिळणार आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान यांच्यासोबत जय विज्ञान असा नारा दिला होता. आता मी यामध्ये जय अनुसंधान या नाऱ्याची भर घालतो.''
PM Modi at 106th Indian Science Congress in Jalandhar,Punjab: The life and works of Indian Scientists are a compelling testament of integration of deep fundamental insights with technology development & nation-building. pic.twitter.com/7Djp6M0v7E
— ANI (@ANI) January 3, 2019
आज केंद्र सरकार तरुणांना स्टार्टअपसाठी प्रेरित करत आहे. त्यासाठी मदतही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे पिकांचे उत्पन्न वाढले आहे. पण अजूनही नवभारताच्यासमोरील आव्हान पाहता यामध्ये वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापरही झाला पाहिजे. इज ऑफ डुईंग बिझनेसनंतर आता इज ऑफ लिव्हिंगसाठी काम झाले पाहिजे. त्यासाठी पिण्याचे पाणी, हवेची गुणवत्ता, सायबर सुरक्षा यासह अनेक अशा क्षेत्रांमध्ये जिथे सुधारणा केली जाऊ शकते, अशासाठी देशातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे मोदींनी सांगितले.