आता AI देईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे, पीएम किसान योजनेसाठी चॅटबॉट सुरू, मोदी सरकारचा मोठा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:35 AM2023-09-27T10:35:17+5:302023-09-27T10:40:41+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित आणि अचूक उत्तरे देण्यासाठी एआय (AI) चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी मोदी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. दरम्यान, पीएम किसान योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित आणि अचूक उत्तरे देण्यासाठी एआय (AI) चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी पीएम किसान एआय चॅटबॉट लाँच केले. यामध्ये विविध भाषांमधील सुविधा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पीएम-किसान तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये एआय चॅटबॉट सादर करण्याचा उद्देश शेतकऱ्यांना सुलभ आणि सोपा व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
कृषी सचिव मनोज आहुजा आणि अतिरिक्त कृषी सचिव प्रमोद मेहराडा यांच्या उपस्थितीत कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी एआय चॅटबॉट लाँच केले. कार्यक्रमादरम्यान, अतिरिक्त कृषी सचिव प्रमोद मेहराडा यांनी चॅटबॉटची वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर आहे, याबद्दल सविस्तर सांगितले.
निवेदनानुसार, चॅटबॉट सध्या इंग्रजी, हिंदी, बंगाली, उडिया आणि तामिळ भाषेत सुरु करण्यात आले आहे. लवकरच देशातील सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध होईल. एकस्टेप फाउंडेशन आणि भाशिनी यांच्या मदतीने हा चॅटबॉट विकसित आणि सुधारला जात आहे. एआय चॅटबॉट त्याच्या विकासाच्या टप्प्यात शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती, पेमेंट तपशील, अपात्रतेची स्थिती आणि इतर योजना-संबंधित अद्यतनांची माहिती मिळविण्यात मदत करेल.
दरम्यान, मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एआय चॅटबॉट लाँच हे पीएम-किसान योजनेची कार्यक्षमता आणि पोहोच वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची त्वरित, स्पष्ट आणि अचूक उत्तरे मिळतील.