'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 03:18 PM2018-06-21T15:18:38+5:302018-06-21T15:18:38+5:30
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी काल राजीनामा दिला
नवी दिल्ली: मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सुब्रमण्यन वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं. सुब्रमण्यन यांच्या आधी तीन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मोदी सरकारची साथ सोडली आहे.
अरविंद सुब्रमण्यन: सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्य आर्थिक सल्लागार हे आपलं सर्वात आवडतं काम होतं आणि अरुण जेटली हे सर्वोत्तम बॉस होते, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं. सुब्रमण्यन सप्टेंबरपर्यंत त्यांचं पद सोडणार आहेत.
अरविंद पानगढिया: गेल्या वर्षी पानगढिया यांनी निती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कोलंबिया विद्यापीठातील अध्यापन पुन्हा सुरु करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. पानगढिया दीड वर्ष निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी होते.
रघुराम राजन: जून 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं. सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपल्यावर पुन्हा अध्यापनाकडे वळणार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. राजन यांच्या राजीनाम्याची खूप चर्चा झाली होती. राजन यांना गव्हर्नरपदी राहण्याची इच्छा होती. मात्र सरकारची आर्थिक धोरणं पटत नसल्यानं त्यांनी पायउतार होणं पसंत केल्याचं वृत्त त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी दिलं होतं.
विजयलक्ष्मी जोशी: स्वच्छ भारत अभियानाला एक वर्ष पूर्ण होण्याआधी जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे या अभियानाचं प्रमुखपद होतं. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी होत्या.