मोदी सरकारला मोठा धक्का! लोकसभेत आज सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 08:54 AM2018-03-16T08:54:13+5:302018-03-16T12:00:58+5:30
त्यामुळं आज लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे आंध्र आणि तेलंगणा असे विभाजन झाल्यावर आंध्रला खास दर्जा देण्याचे काँग्रेसने मान्य केले होते. पण चौदाव्या वित्त आयोगाचा अहवाल संसदेत सादर होऊन संसदेने मंजूर केल्यावर आंध्रला खास दर्जा देणे मोदी सरकारला शक्य नव्हते. त्यामुळं नाराज होऊन तेलगू देसमचे नेत्यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिले. सरकार या धक्यातून सावरत नाही तोपर्यंत दोन दिवसांपूर्वी लोकसभेच्या दोन जागावरही भाजपाचा पराभव झाला. याच संधीचा फायदा घेत वायएसआर काँग्रेस पक्षाकडून मोदी सरकारविरोधात अविस्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या अविश्वास प्रस्तावाला तेलगू देसम पक्षाचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.
अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा सचिवांकडे निवेदन दिले आहे. तसेच हा विषय शुक्रवारच्या कामकाजामध्ये समाविष्ट करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सुब्बा रेड्डी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेटही घेतली आहे. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी असलेल्या तेलगू देसम पक्षाने या अविश्वास प्रस्तावास आवश्यता भासल्यास पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून तूर्त बाहेर न पडण्याचा निर्णय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमने घेतल्याने, भाजपा नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, केंद्र सरकारने आमच्या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास संसदेत व बाहेर आंदोलनाचा पवित्रा आम्हाला उचलावा लागेल, असा इशाराही पक्षाने दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात विभाजित आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने वा राज्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात न आल्याने चंद्रबाबू नायडू यांनी भाजला रालोआमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांची रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अमित शहा यांच्याशी बोलणे नाही
तेलुगू देसमचे लोकसभेत १६ व राज्यसभेत ६ सदस्य आहेत. इतक्या खासदारांचा पाठिंबा कमी झाला असता, तर भाजपाला मोठाच धक्का बसला असता. विशेषत: राज्यसभेत आताच भाजपाप्रणित रालोआला बहुमत नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज चंद्राबाबू नायडू यांना फोन करून, रालोआतून बाहेर पडू नका, अशी विनंती केली, अशी चर्चा होती. मात्र, नायडू व अमित शहा यांचे संभाषण झाले नसल्याचा दावा चौधरी यांनी केला.