मोदी सरकारची मोठी कारवाई, Part-time Job च्या नावाखाली फ्रॉड करणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट्स ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 03:01 PM2023-12-06T15:01:29+5:302023-12-06T15:01:57+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाने ब्लॉक केलेल्या वेबसाइट्स देशाबाहेरून ऑपरेट केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : अनेकजण पार्ट टाईम जॉब करतात. मात्र, अलीकडच्या काळात पार्ट टाईमज जॉब आणि गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता या संदर्भात भारत सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कठोर कारवाई करत केंद्रीय गृह मंत्रालयाने पार्ट टाईम जॉब आणि अवैध गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा जवळपास १०० हून अधिक वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने ब्लॉक केलेल्या वेबसाइट्स देशाबाहेरून ऑपरेट केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत या वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. गृह मंत्रालयाशी संलग्न नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिट (NCTAU) चे एक युनिट इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेन्सरने (I4C)गेल्या आठवड्यात या वेबसाइट्स ब्लॉक करण्याची मागणी केली होती.
I4C division of the Ministry of Home Affairs, through its vertical National Cybercrime Threat Analytics Unit (NCTAU), had last week identified and recommended to ban over 100 websites involved in organized investment and task based - part time job frauds. pic.twitter.com/yLI1vvayVY
— ANI (@ANI) December 6, 2023
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेन्सरद्वारे असे सांगण्यात आले की, या वेबसाइट्स युजर्सना नोकरी आणि गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवत आहेत आणि त्यांना फसवणुकीचे बळी बनवले जात आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या सर्व वेबसाइट्स लोकांना फसवण्यासाठी जाहिराती, चॅट मेसेंजर आणि भाड्याने घेतलेल्या खात्यांचा आधार घेत होत्या. तसेच, आर्थिक फसवणूक करून कमावलेला पैसा क्रिप्टो करन्सी, परदेशी एटीएममधून पैसे काढणे आणि अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवला जात आहे.