मोदी सरकार 2024पर्यंत बनवणार 100 नवी विमानतळं; 1 हजार हवाई मार्ग उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:13 PM2019-10-31T12:13:47+5:302019-10-31T12:14:11+5:30
पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.
नवी दिल्लीः पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मोदी सरकार 2024पर्यंत 100 नवी विमानतळं बनवण्याच्या विचारात असून, सरकारच्या प्रस्तावानुसार एक हजार नवे हवाई मार्गे सुरू करण्यात येणार आहेत. हे मार्ग छोटी शहरं आणि गावांना जोडणार आहेत.
ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत 2025पर्यंत मूलभूत पायाभूत सुविधा आणखी विकसित होणार आहेत. बैठकीतल्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, प्रत्येक वर्षी 600 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पाच वर्षांत विमानांची संख्या दुप्पट म्हणजे 1200पर्यंत नेण्याचीही चर्चा सुरू आहे. अर्थव्यवस्था सध्या सुस्तावलेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारनं गेल्या महिन्यात कॉर्पोरेट टॅक्समध्येही कपात केली होती.
ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, शेजारील देश चीनमध्ये विमानतळांची संख्या वेगानं वाढत आहे. चीननं 2035पर्यंत 450 व्यावसायिक विमानतळ बनवण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. जी 2018 तुलनेत दुप्पट आहे. तीन वर्षांपूर्वी भारतात फक्त 75 रनवे कार्यरत होते. मोदी सरकारनं आतापर्यंत 38 विमानतळांना देशाच्या एव्हिएशन मॅपशी जोडलेलं आहे. मोदी सरकार पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.