केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक; होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकतं मोठं गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:31 PM2022-03-15T18:31:40+5:302022-03-15T18:32:11+5:30
Modi Government Cabinet Meeting : चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची Cabinet Meeting) बैठक उद्या दुपारी एक वाजता संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. मंत्रिमंडळाची ही बैठक कोणत्या अजेंड्यावर होणार, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. तसेच, चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक होणार आहे.
बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. देशभरातील लाखो कर्मचारी वाढीव डीएच्या प्रतीक्षेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सरकार दरवर्षी मार्चमध्ये महागाई भत्ता जाहीर करते. यावेळी उद्या म्हणजेच 16 तारखेला होणाऱ्या या बैठकीत सरकार महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते, अशी अपेक्षा आहे.
जानेवारी 2022 पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार होता, मात्र सरकार आता महागाई भत्त्या वाढवण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाईल. होळीनंतर कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, याआधी महागाई भत्ता हा 31 टक्के देण्यात येत होता, आता तो 34 टक्के मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या 18 महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळाला नाही. त्यावर केंद्र सरकार आता वन टाईम सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगलीच वाढ होणार आहे.
किती रुपये मिळणार महागाई भत्ता?
एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर त्याला 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळू शकतो. जर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आणि तो 34 टक्के केला तर त्या हिशोबाने महागाई भत्ता 6120 रुपये प्रति महिना इतका होईल.