नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ४ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक, कोरोनावर होणार चर्चा
By ravalnath.patil | Published: November 30, 2020 03:27 PM2020-11-30T15:27:21+5:302020-11-30T15:32:14+5:30
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : दिवाळीनंतर दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशात सर्वत्र विशेष काळजी घेतली जात आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर आळा घालण्यासाठी चर्चा आणि रणनीती तयार करण्यासाठी केंद्र सरकारने येत्या ४ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांनाही या ऑनलाईन बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्रालय या बैठकीचे आयोजन करणार आहे.
देशात आतापर्यंत एकूण ९४ लाख ३१ हजार ६९२ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत भारतातील ३८ हजार ७७२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तर ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कोरोनापासून ४५, १५२ लोक बरे झाले आहेत. कोरोना साथीमुळे आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काल किंचित घट दिसून आली. रविवारी राज्यात ५ हजार ५४४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्लीप्रमाणे राज्यात सुद्धा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश राज्यातील ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाऊन असणार आहे.