भारताचा ड्रॅगनला दणका! चिनी कंपन्यांची कंत्राटं रद्द; आर्थिक कोंडी करण्याची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:59 AM2020-06-19T04:59:03+5:302020-06-19T07:17:48+5:30
आर्थिक कोंडी करण्याची तयारी सुरू; हुवेईकडून ५-जी सेवा घेणार नाही; भारताचा कठोर संदेश
नवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना भीक न घालता भारताने सीमेवर युद्धसज्जता करून राजनायिक, आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही चीनची कोंडी सुरू केली आहे. सीमेलगत लष्करी हालचाली वाढवून ड्रॅगनला झुकवण्यासाठी चिनी कंपन्यांना दिलेली दोन कंत्राटेही भारताने रद्द केली. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात ५ जी नेटवर्कसाठी हुवेई या चिनी कंपनीची निवडही रद्द करून भारताने कठोर संदेश आंतरराष्ट्रीय समुदायात चीनची तळी उचलणाऱ्यांना दिला आहे.
येत्या २३ जूनला होणाऱ्या रशिया व चिनी परराष्ट्र मंत्र्यांसमवेत बैठकीत सहभागी होण्याचे ठरवून भारताने मुत्सद्देगिरीतही नवा पायंडा पाडला. गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर आपला एकही सैनिक चीनच्या ताब्यात नाही, असेही भारताने स्पष्ट केले. या आक्रमक भूमिकेमुळे मवाळ झालेल्या चीनने आम्ही चर्चेने प्रश्न सोडवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र भारतामुळेच हे घडल्याची कागाळीही केली. अर्थात पाकिस्तान व नेपाळ वगळता एकही देश आता चीनची बाजू घ्यायला तयार नाही. त्यामुळे चीन एकाकी पडत आहे.
चीनच्या हल्ल्याची संतप्त प्रतिक्रिया देशात उमटली होता. आजचा दिवसही घडामोडींचा ठरला. गलवान खोºयात दोन्ही देशांच्या मेजर जनरलची चर्चा सहा तासांनंतरही संपली. चीनने ६ जूनला ठरल्याप्रमाणे जैसे थे स्थिती स्वीकारावी, यावर भारत ठाम आहे. स्थिती पूर्ववत करण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शुक्रवारीदेखील ही चर्चा होईल.
शांतता हवी, पण भूभाग सोडणार नाही
चर्चेने वाद मिटवण्यावर व सीमेवर शांतता राखवण्यावर आमचा भर आहे. पण आमचा भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ठामपणे सांगितले. पंतप्रधान म्हणाले त्या प्रमाणे सार्वभौमत्व व सीमासुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा इशारा परराष्टÑ प्रवक्त्याने दिला. नरेंद्र मोदी यांनी आज परराष्ट्र व संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करूनघडामोडींची माहिती करून घेतली. आर्थिक आघाडीवरही अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे.
सुखोई, मिग विमानांची खरेदी लगेचच
संरक्षण सिद्धतेत भर घालण्यासाठी २१ सुखोई व २१ मिग लढाऊ विमानांच्या खरेदीची प्रक्रिया वेगाने केली जाईल. हवाई दलाने तसा प्रस्ताव याआधीच संरक्षण मंत्रालयास पाठवला आहे.एकूण ५ हजार कोटींच्या या खरेदीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल.
ड्रॅगनच्या शेपटीवर घाव
चीनने याचप्रकारे कुरापती काढण्याचे सुरू ठेवल्यास हाँगकाँग, तैवान आणि तिबेटबाबत चीनच्या विरोधात भूमिका घेऊ न, ड्रॅगनची शेपटी आवळण्याची तयारी भारताने ठेवली आहे. तिबेट, हाँगकाँग व तैवानबाबत अन्य देश सतत चीनवर टीका करीत असले तरी आतापर्यंत भारताने स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. पण आता या प्रश्नावरही चीनविरोधात भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भारत केंद्रस्थानी : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्यपदी भारताची निवड झाली. १९२ पैकी १८४ सदस्यांनी भारताच्या बाजून मतदान केले. भारत अस्थायी सदस्य झाल्याने आता जागतिक शांततेसाठी एकत्र प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली.
नौदल, हवाई दल सज्ज
दोन्ही देशांतील चर्चा निष्फळ ठरत असल्याने भारताने नौदल व हवाई दल यांना सज्स राहण्यास सांगितले आहे. तसेच सीमेवर जास्तीत जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्व समुद्री सीमांवर नौदलाचे सैनिक सज्ज असून, युद्धनौका, विमानवाहू नौका याही तयारीत आहेत.