...तर भारतीय बाजारातून 'चिनी कम' होणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:20 AM2020-06-20T04:20:12+5:302020-06-20T06:42:47+5:30
चीनवरून भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यापुढे हे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर जसा तणाव वाढला आहे तसेच दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही ताणले जाताना दिसत आहेत. चीनमधून येणाऱ्या अनेक वस्तूंवर भारताचे अर्थमंत्रालय सीमाशुल्क वाढवण्याच्या विचारात आहे. चीनवरून भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यापुढे हे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणावर येणाºया चिनी अनावश्यक वस्तूंवरील कर लावण्याबाबत विचार सुरू आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीची मनगटी घड्याळे, भिंतीवरील घड्याळे, इलेक्ट्रानिक्स साहित्य, फर्निचर, खेळणी, वाद्ये, खेळांचे साहित्य, गाद्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू आदींचा वापर दैनंदिन जीवनात वापरतात.
कर वाढवताना सरकारचे याकडेही लक्ष असणार आहे की, या वस्तूंचे उत्पादन यापुढे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतातच मोठ्या प्रमाणात केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपुढे आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. यासोबत त्यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देत भारतीयांना स्वावलंबी बनण्याचा आग्रह धरला होता. भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही मोदींच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. वांगचुक यांनी चीनवर बहिष्कार टाकण्याबाबत पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर कान्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेनेही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला आणि भारतीय वस्तूंना प्राधान्य द्या, असे आवाहन केले होते. कॅटने बहिष्कार घालता येतील अशा ३ हजार चिनी उत्पादनांची यादीच जारी केली
होती.