सरकारने एअर इंडियाच्या विमान भाड्याचे 326 कोटी रुपये थकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 01:01 PM2018-03-13T13:01:35+5:302018-03-13T13:08:44+5:30
वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात.
नवी दिल्ली: कर्जाच्या ओझ्यामुळे आधीच दबलेली एअर इंडिया सरकारच्या 'चलता है' वृत्तीमुळे आणखीनच गर्तेत चालल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या विमान प्रवासाचे 326 कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या कागदपत्रांमुळे ही बाब उघड झाली.
या माहितीनुसार, विविध सरकारी खात्यांनी मिळून एअर इंडियाची एकूण 325.81 कोटी रूपयांचे बिल थकवले आहे. यामध्ये गेल्यावर्षीचे 84.01 कोटी आणि यंदाच्या 241.80 कोटी रूपयांचा समावेश आहे. एअर इंडियाकडून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या सरकारी व्यक्तींच्या प्रवासासाठी खासगी विमाने उपलब्ध करून दिली जातात. वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात.
अहवालातील माहितीनुसार एअर इंडियाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय आघाडीवर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्वाधिक 178.55 कोटींची रक्कम थकवली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाने 128.84 कोटी, तर संरक्षण मंत्रालयाने 18.42 कोटी रूपयांची देणी थकवली आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापोटी झालेल्या 272.80 कोटींच्या खर्चापैकी 118.72 कोटी रूपये अजूनही एअर इंडियाला मिळालेले नाहीत. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करणार आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.