मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती

By admin | Published: June 14, 2016 04:31 AM2016-06-14T04:31:29+5:302016-06-14T04:31:29+5:30

दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, निर्णय प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे सांगत भाजपाने सोमवारी आपल्या कामगिरीचा

Modi government, due to the pace of economy | मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती

Next

अलाहाबाद : दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, निर्णय प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे सांगत भाजपाने सोमवारी आपल्या कामगिरीचा लेखाजेखा मांडला.
सरकारने एकात्मिक आर्थिक दृष्टिकोन अवलंबला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेची ७.९ टक्के वाढ झाली आहे, तसेच कृषी विकासही नकारात्मक स्थितीतून बाहेर येत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. त्यांनी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘कृषी विकास आता २.४ टक्के आहे. पूर्वी तो ०.२ टक्के होता. परिस्थिती नकारात्मक होती. या पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळात ३.५ कोटी बँक खाती होती, पंतप्रधानांनी जन धन योजना सुरू केल्यानंतर खातेधारकांची संख्या वाढून २१.८० कोटी झाली असून, यातील अनेक जण डेबिट कार्ड व दुर्घटना विमा यांसारख्या सुविधांचा लाभही घेत आहेत.’ बळीराजाच्या उन्नतीप्रती सरकारची बांधिलकी दर्शविताना ते म्हणाले की, ‘पुढील चार वर्षांत प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात ५० हजार कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.’
युरिया मिळविण्यासाठी या पूर्वी भांडणे होत. मात्र, आता युरियाचे २५ लाख टन एवढे विक्रमी उत्पादन करण्यात आले असून, तो सहजरीत्या मिळतो. निम कोटेड युरियाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘यामुळे युरियाचा इतर उद्देशांसाठी काळाबाजार होणार नाही.’ ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘देशात कोळशाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून, त्यामुळे औष्णिक ऊर्जेची निर्मिती वाढली. भ्रष्टाचारमुक्त निर्णयामुळे आता देशात धोरण लकव्यासारखी स्थिती उरली नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीचा आज अखेरचा दिवस आहे.’
चंद्रशेखर आझादांना पुष्पांजली
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील चंद्रशेखर आझाद पार्कला भेट देऊन महान क्रांतिकारकाच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. आठ दशकांपूर्वी याच पार्कमध्ये आझाद यांनी इंग्रजांशी लढताना अखेरचा श्वास घेतला होता. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. पंतप्रधानांना हात हलवून त्यांना अभिवादन केले. बैठकीकडे जाताना पंतप्रधानांचा ताफा चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये थांबला.
त्रिवेणी संगमावर नेत्यांचे स्नान
भाजपा नेत्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची संधी साधली. केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज संगमावर स्नान केले. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी रविवारी संगमावर स्नान केले होते. तथापि, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे आनंद भवन पाहण्यासाठी गेले असता, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध केला. आनंद भवन हे नेहरू-गांधी कुटुंबाचे वाडवडिलोपार्जित घर आहे. (वृत्तसंस्था)

भाजपाचा आलेख उंचावतोय : गडकरी
भाजपाचा आलेख उंचावत असून, आमच्याच पक्षाला भवितव्य आहे. याउलट काँग्रेस पक्ष मात्र नामशेष होत चालला आहे, असे प्रतिपादन भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले.
केरळसारख्या दक्षिण भारतातील राज्यात वा आसाम व पश्चिम बंगालसारख्या पूर्व उत्तर भारतासारख्या राज्यांत भाजपाचे आतापर्यंत फारसे अस्तित्व नव्हते, पण आता भाजपा संपूर्ण देशभर वाढत चालला असून, ज्या ठिकाणी काँग्रेस मोठी होती, तिथे ती आता नावालाच शिल्लक राहिली आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांत येत्या काळात भाजपाच प्रमुख पक्ष बनलेला पाहायला मिळेल.

उत्तर प्रदेशात भाजपाचा मुख्यमंत्री या पदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याचे गडकरी यांनी टाळले. पक्षाध्यक्षांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा असतो आणि तो त्यांचा अधिकार आहे. -नितीन गडकरी

Web Title: Modi government, due to the pace of economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.