मोदी सरकारने खोटेपणा केला; इराकमधून जिवंत परतलेल्या हरजितने वाचला अन्यायाचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 10:29 AM2018-03-21T10:29:43+5:302018-03-21T10:29:43+5:30
मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांमधून जिवंत बचावलेला 27 वर्षीय हरजित मसिह स्वतःच्या विधानावर अद्यापही ठाम आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने 2014मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व 39 भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली होती.
अमृतसर- इराकमधल्या मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांमधून जिवंत बचावलेला 27 वर्षीय हरजित मसिह स्वतःच्या विधानावर अद्यापही ठाम आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने 2014मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व 39 भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली होती. मात्र या 40 जणांमधून जिवंत बचावलेला हरजित मसिह यानं दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी केला आहे.
सरकारनं भारतीयांचं अपहरण करून त्यांना ठार केल्याच्या वृत्तावर विश्वास का ठेवला नाही, असा सवाल हरजित मसिह यानं विचारला होता. इसिसच्या जाळ्यातून सुखरूप सुटलेले हरजित मसिह म्हणाला, 11 जून 2014ला केंद्र सरकारला भारतीयांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची माहिती दिली होती. इसिसच्या जाळ्यातून सुटलेले मसिह हे एकटेच असल्याचा त्याचा दावा आहे. त्याच्यासमोर 39 भारतीय मजुरांची हत्या करण्यात आली होती. मसिह त्या 40 नागरिकांमधील एक आहे. ज्याचं इराकमधल्या मोसूल शहरात इसिस या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलं होतं. दहशतवाद्यांनी त्यावेळी बांगलादेशी आणि भारतीयांचे दोन वेगवेगळे गट बनवले होते. तसेच बांगलादेशींना जाण्याची परवानगी दिली होती. हे सर्व मजूर मोसूलमध्ये टेक्सटाइल कारखान्यात कामाला होते. सरकारनं मला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि 39 इतरांच्या कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली होती. मी इसिसनं 39 लोकांना मारल्याचं वृत्त सरकारला सांगितलं होतं. परंतु माझ्यावर सरकारनं विश्वास ठेवला नाही. सरकारनं इसिसच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 39 कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली.
मसिह सध्या गुरदासपूरमधल्या बाजारात मजूर म्हणून काम करत आहे. मसिहच्या मते, मला सहा महिन्यांपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण मी सरकारला सर्व काही खरं सांगितलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं माझ्यावर विश्वास ठेवला नाही. जवळपास 6 महिने मी तुरुंगात होतो. याची भरपाई कोण करणार ?, मसिहच्या कुटुंबीयांनी त्याला इराकला पाठवण्यासाठी 1.5 लाख रुपये उधारीवर घेतले होते. हरजित यांच्या मते, इसिसच्या दहशतवाद्यांनी 40 भारतीयांचं अपहरण करत त्यांचा खून केला. परंतु त्यातून मी थोडक्यात बचावलो आणि लागलीच कारखान्यात गेलो. तिथे मला बांगलादेशी मजुरांनी स्वतःचे कपडे दिले. त्यांच्यासोबत मी अली बनून पळालो. त्यावेळी एका बांगलादेशीनं माझा सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क करून दिला आणि मी भारतात परतलो. परंतु सुषमा स्वराज यांनी हरजित मसिह हा खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे.