मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; तरुणांना नोकऱ्या अन् इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:06 PM2021-12-16T14:06:05+5:302021-12-16T14:07:01+5:30
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
नवी दिल्ली – मोदी सरकारने बुधवारी सेमीकंडक्टर प्रकरणी भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने पीएलआय(PLI Scheme) योजनेतंर्गत जवळपास ७६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ज्यात भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत मिळणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा निर्णय गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. कारण सेमी कंडक्टरमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवलं जाईल. दुसरीकडे नोकऱ्या उपलब्ध होतील. अनेक नवीन स्टार्टअप उभे राहतील.
सेमी कंडक्टर म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं झालं तरी सेमी कंडक्टर म्हणजे अनेक उत्पादनासाठी तो महत्त्वाचा भाग आहे. तो कंडक्टर आणि नॉन कंडक्टर या इंसुलेटर्समधील दुवा असतो. त्यात करंट येण्याची क्षमता मेटल आणि सेरामिक्स तुलनेने अधिक असते. सेमी कंडक्टर मुख्यपणे सिलिकॉनपासून बनवण्यात येते.
रोजगार कसे उपलब्ध होणार?
मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, सेमी कंडक्टरमुळे भारत आत्मनिर्भर बनल्याने नोकरीच्या लाखो संधी उपलब्ध होतील. सेमी कंडक्टर डिझाईन करण्यासाठी ८५ हजार कतृत्ववान इंजिनिअर्सची फौजची गरज भासेल. मोदी सरकार सेमी कंडक्टरशी जुळलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये ही संधी प्राप्त होईल. त्यात छोट्या पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत नोकऱ्या मिळतील. या इंडस्ट्रीमध्ये केवळ काम करणारे कर्मचारी नसतात तर मॅनेजर, मार्केटिंग आणि सेल्स, एचआर, एडिमिनिस्ट्रेशन, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा गार्ड यांचाही समावेश आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे स्टार्टअप करण्याची संधी उपलब्ध होईल.
सेमी कंडक्टर कोणत्या कामासाठी वापरतात?
सेमी कंडक्टरचं काम इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पॉवर देण्याचं काम करते. त्यामाध्यमातून कम्प्युटिंग, ऑपरेशन कंट्रोल, डेटो प्रोसेसिंग, स्टोरेज, इनपुट-आऊटपुट मेनजमेंट सेसिंग, वायरलेस कनेक्टिवी वेगाने कार्यान्वित होते. याचा अर्थ याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्वांटम कम्प्यूटिंग, एडवान्स वायरलेस नेटवर्क, ब्लॉकचेन एप्लिकेशन, रोबोट, ड्रोन, गेम, स्मार्टवॉच इतकचं नाही तर ५ जी तंत्रज्ञानाचीही कल्पना केली जाऊ शकत नाही.
कुठे कुठे सेमी कंडक्टरचा वापर होतो?
सेमी कंडक्टरचा वापर गाड्यांव्यतिरिक्त स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, डेटा सेंटर, संगणक, टॅबलेट, एटीएम, एग्रीटेक साहित्य तसेच घरात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज, वॉशिंग मशिनसारख्या वस्तूंमध्ये होतो. म्हणजे सेमी कंडक्टरशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू काम करणार नाहीत.
वस्तू स्वस्त कशा होणार?
सध्याच्या काळात सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटो कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कोरोनामुळे अनेक फॅक्टरी बंद पडल्या. ज्यामुळे बाजारात सेमी कंडक्टरचा तुटवडा जाणवू लागला. आता भारत सर्व प्रकारचे सेमी कंडक्टर आयात करतो. त्यामुळे सेमी कंडक्टर महागात पडतात. परंतु जर भारतातच सेमी कंडक्टर बनवण्यात आले तर आयात करण्याची गरज भासणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील. म्हणजे सेमी कंडक्टर ज्या ज्या वस्तूमध्ये वापरण्यात येईल त्यांच्या दरात कपात झाल्याचं दिसून येईल.
काय आहे मोदी सरकारचा प्रयत्न?
पुढील सहा वर्षांत सेमी कंडक्टर्सच्या बाबतीत देशाने स्वयंपूर्ण व्हावे, यादृष्टीने या प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. भारत हे केवळ सेमी कंडक्टरच नव्हे, तर सर्वच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे प्रमुख निर्मिती केंद्र बनावे, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. नव्या सेमी कंडक्टर धोरणामुळे देशात वाहनांचे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादनही अधिक वेगाने होणे शक्य आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.