मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:33 AM2018-05-26T01:33:25+5:302018-05-26T01:33:25+5:30
भाजपा २0१९ च्या तयारीला; विकासकामांचा आणला व्हिडीओ
नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शनिवारी चार वर्षे पूर्ण होत असून, २0१९च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपाने आता ‘साफ नियत, सही विकास - २0१९ में फिर से मोदी सरकार’ अशी घोषणा तयार केली आहे. मात्र मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करून काँग्रेस उद्या ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहे. चार वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाने खास घोषणा तयार केली आहे. शिवाय भाजपाने विकासकामांचा व्हिडीओ तयार केला असून, तो प्रसारित केला जाईल.
काँग्रेसतर्फे आज विश्वासघात दिन
मोदी सरकार जनताविरोधी धोरणे कशी अवलंबत आहे, या काळात इंधनाचे दर कसे वाढवले, लोकांना रोजगारांना कसे मुकावे लागले, महागाई कशी वाढवली, काही उद्योगपतींचाच कसा फायदा झाला, हे सारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांमार्फत करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. पक्षाने एक पोस्टर प्रकाशित केले असून, त्यावर ‘विश्वासघात’ असे लिहिलेले आहे. ते प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका व राज्यांच्या राजधान्यांमध्ये लावण्यात येईल.
पण लोकप्रियतेत मोठी घट
मोदींना दुसरी टर्म देण्यास जवळपास अर्ध्या जनतेचा नकार विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून जनतेत असलेली नाराजी यांचा फटका मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत.एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्व्हेनुसार मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याची चिन्हे आहे. मोदींना दुसरी टर्म देण्यास जवळपास अर्ध्या जनतेने नकार दिला आहे.
राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपाचा पराभव होण्याची चिन्हे
राजस्थान, मध्यप्रदेशात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका आहेत. तेथे सत्ताधारी भाजपाऐवजी काँग्रेसला पसंती आहे. महाराष्टÑातही मोदी सरकारबद्दल नाराजी वाढत आहे.
राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत वाढ
राहुल यांची लोकप्रियता वाढत आहे. ती आता मोदींच्या बरोबरीत आली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दोघांत टस्सल पहायला मिळेल.
2019 मध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही. मित्रपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार स्थापन करावे लागेल.