मोदी सरकारने नोकरशाहीत केले मोठे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:28 AM2019-10-23T01:28:48+5:302019-10-23T06:17:39+5:30
दोन डझन अधिकाऱ्यांची पदोन्नती तसेच पदावनती; ब्रज राज शर्मा कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी प्रशासनाने नोकरशाहीत सचिव आणि सहसचिव पातळीवरील जवळपास दोन डझन अधिकाऱ्यांची पदोन्नती/पदावनती केली आहे. ब्रज राज शर्मा (आयएएस, १९८४, जम्मू-काश्मीर) यांना कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष केले आहे. ते सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव होते.
संजीव गुप्ता (आयएएस, १९८५, हिमाचल प्रदेश) यांना मूळ जागी म्हणजे गृह मंत्रालयात आंतरराज्य परिषदेचे सचिव म्हणून तर शैलेश यांंना डिपार्टमेंट आॅफ पब्लिक एंटरप्रायजेसचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे. सध्या शैलेश हे अल्पसंख्याक मंत्रालयात सचिव आहेत.
उत्तर प्रदेश केडरचे अलोक टंडन यांना प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक गाºहाणी विभागाचे सचिव नेमले आहे. ते त्यांच्या नव्या जबाबदारीसोबत पेन्शन्स आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचा सचिवपदाचा अतिरिक्त कारभारही पाहतील. सध्या ते नोएडा अॅथॉरिटीचे अध्यक्ष आहेत.
संजीव नंदन सहाय (आयएएस, १९८६ केंद्रशासित) यांना त्यांच्या मूळ जागी, ऊर्जा मंत्रालयात सचिव नेमण्यात आले आहे.
तेथून सुभाषचंद्र गर्ग (आयएएस, १९८३, राजस्थान) हे ३१ आॅक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. सहाय हे ऊर्जा मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. प्रमोद कुमार दास (आयएएस, १९८६, मध्यप्रदेश) यांना अल्पसंख्य कामकाज मंत्रालयात सचिवपद दिले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागात विशेष सचिव आहेत.
नागेंद्रनाथ सिन्हा (आएएस, १९८७, झारखंड) सध्या नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांतर्गत एनएचएआयचे अध्यक्ष असून त्यांना सीमा व्यवस्थापन विभागात सचिवपदी नेमण्यात आले आहे. तुहीन कांता पांडेय यांना अनिल कुमार खाची यांच्या जागी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नेमण्यात आले आहे.
खाची यांना त्यांच्या मूळ राज्यात हिमाचल प्रदेशला पाठवण्यात आले आहे. नागालँड केडरचे पंकज कुमार हे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिवपदाच्या दर्जाचे व वेतनाचे असतील. ही पदोन्नती तात्पुरती आहे. सध्या ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव आहेत.
राजेश भूषण यांना मंत्रिमंडळ सचिवालयात त्यांच्या मूळ जागी सचिव (समन्वय) नियुक्त केले गेले आहे. ट्रिफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर कृष्णा हे सचिवपदाचा दर्जा व वेतनाचे आहेत.