मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार 'दिवाळी गिफ्ट'? आज होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:43 PM2019-10-23T12:43:27+5:302019-10-23T12:52:53+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार गहू, हरभरा, सातू, मोहरी, मसूर आदी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याची शक्यता असून यासंबंधीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे समजते.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा देशातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (सीएसीपी) दिलेल्या शिफारशीनुसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला चालना देण्याकरिता मोदी सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.
सुत्रांच्या माहितीनुसार, 2019-20 च्या रब्बी हंगामासाठी गहू 1,925 रुपये प्रती क्विंटल, मोहरी 4,425 रुपये प्रती क्विंटल, हरभरा 4,825 रुपये प्रती क्विंटल, मसूर 4,800 रुपये प्रती क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत करण्याची शिफारस कृषी खर्च व किंमत आयोगाने केल्याचे समजते. दरम्यान, 2018-19 या रब्बी हंगामात गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत प्रती क्विंटल 105 रुपये, बार्ली प्रती क्विंटल 30 रुपये, मसूर प्रती क्विंटल 225 रुपये, हरभरा प्रती क्विंटल 220, मोहरी प्रती क्विंटल 200 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.