मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’
By admin | Published: January 14, 2015 05:17 AM2015-01-14T05:17:49+5:302015-01-14T05:17:49+5:30
मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली
नवी दिल्ली : मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली. मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन आणि अन्य वटहुकुमांना जोरदार विरोध करण्याचा निर्धार हे मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचे वैशिष्ट्य राहिले. मात्र पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावरील जबाबदारीच्या विस्ताराचा विषय या बैठकीत निघालाच नाही.
बैठकीचा प्रारंभ करतानाच सोनिया यांनी मोदी सरकारवर सडेतोड टीका केली. संपुआ सरकार घटनात्मक मत अजमावत निर्णय घेत होते. वटहुकूम हा न्यायालयीन प्रक्रियेतील अखेरचा उपाय ठरत असताना मोदी सरकार मात्र सुप्रशासनाच्या नावाखाली वटहुकुमाचा धोकायदायक वापर करीत आहे, असे त्या म्हणाल्या. यापूर्वीच्या संपुआ सरकारने भूसंपादन कायदा दीर्घ चर्चा आणि सल्लामसलत करून आणला होता़ मोदी सरकारने त्यात हवी ती दुरुस्ती घडवून आणण्यासाठी वटहुकुमाचा आधार घेतला आहे. ऐतिहासिक भूसंपादन विधेयकाची पूर्णपणे वाट लावत ब्रिटिशांनी पारित केलेला कायदा मागील दाराने आणला आहे. वटहुकूम आणण्याची एवढी घाई का? त्यामागे छुपा हेतू असल्याचा प्रश्न उपस्थित होतो. कोळसा खाणींसंबंधी वटहुकुमामुळे कोळसा खाणींच्या राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे, असेही त्या म्हणाल्या.