मोदी सरकार दरवर्षी 10 लाख तरुणांना देणार सैन्य प्रशिक्षण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:57 PM2018-07-17T13:57:59+5:302018-07-17T13:59:02+5:30
राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावण्याचा सरकारचा उद्देश
नवी दिल्ली: दरवर्षी 10 लाख तरुणांना सैन्य प्रशिक्षण देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. तरुणांमधील राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी, त्यांचं जीवन अधिक शिस्तबद्ध व्हावं, असा विचार यामागे आहे. युवा सशक्तीकरण म्हणजेच एन-वायईएस अंतर्गत तरुणांना सैन्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.
दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश यात करण्यात येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 महिने शिष्यवृत्ती दिली जाईल. सुरक्षा दल, निमलष्करी दल आणि पोलीस दलात भरती होणाऱ्या तरुणांसाठी हे सैन्य प्रशिक्षण आवश्यक असेल. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान कार्यालयानं या प्रस्तावित योजनेवर विचार करण्यासाठी बैठक बोलावल्याचंदेखील वृत्तात म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालय, युवक कल्याण विभाग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. तरुणांना सैन्य प्रशिक्षणासह व्यवसाय प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, योग, आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय मुल्यांची माहितीदेखील या योजनेच्या माध्यमातून देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी एन-वायईएसच्या अंतर्गत आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तर काहींनी या योजनेऐवजी एनसीसी आणि एनएसएसचा विस्तार करण्याचा विचार मांडला. या योजनेच्या माध्यमातून तरुणांचं जीवन अधिकाधिक शिस्तबद्ध करण्याचा, त्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावण्याचा सरकारचा विचार आहे. देशाला विश्वगुरु करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींचं न्यू इंडिया 2022 व्हिजन साध्य करण्यासाठी या योजनेची मदत होईल, असा विचार यामागे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.