'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 12:51 PM2021-05-30T12:51:11+5:302021-05-30T12:53:09+5:30

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातील नोटबंदीपासून ते सद्यपरिस्थितीतील कोविडच्या कामकाजावरही गंभीर टीका केली आहे.

'Modi government is the most arrogant and arrogant in the country till date', prithviraj chavan on modi sarkar | 'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी'

'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी'

Next
ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातील नोटबंदीपासून ते सद्यपरिस्थितीतील कोविडच्या कामकाजावरही गंभीर टीका केली आहे

मुंबई - मोदी सरकारच्या एकूण कारकिर्दीला आज 7 वर्षे पूर्ण होत असून मोदी सरकार 2 च्या कारकिर्दीला 2 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा लेखजोखा मांडण्याचा प्रयत्न होत आहे. मोदी सरकारने देशाला कसे प्रगतीपथावर नेले, हेही भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लेख लिहून मोदी सरकारच्या कामकाजावर तीव्र शब्दात टीका केली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातील नोटबंदीपासून, पुलवामा हल्ला, कलम 370, सीएए, राष्ट्रवाद, चीनचा सीमावाद ते सद्यपरिस्थितीतील कोविडच्या कामकाजावरही गंभीर टीका केली आहे. मोदी सरकार अहंकारी आणि आडमुठ्या धोरणांचं असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलंय. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी आपल मत मांडताना मोदी सरकावर जबरी टीका केलीय.  

पुलवामा मुद्द्यावरुन बहुमत मिळवले

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा केंद्रात निर्विवाद सत्ता स्थापन केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या पाक पुरस्कृत हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या दुर्दैवी घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी पुरेपूर वापर करून मते मागितली. ०९ एप्रिल २०१९ रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथील जाहीर सभेत मोदी यांनी पुलवामा शहिदांच्या स्मरणार्थ मत देण्याचे आवाहन केले. विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद आणि समता व बंधुत्वाऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष या मुद्द्यांवर निवडणूक लढवून भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळविले.

मोदींच्या अहंकारामुळेच शिवसेनेनं काडीमोड घेतला

सत्तेतील मित्रपक्षाला विश्वासात न घेणे हे एक आणखी मोदींच्या अहंकाराचे आणखी एक वैशिष्ट्य. केंद्रातील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मोदींना मित्रपक्षांची फारशी गरज उरली नाही. त्यामुळेच की काय भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अकाली दलाने भाजपसोबत काडीमोड घेतल्याचेही चव्हाण यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. 

मोदी सरकार आडमुठं अन् अहंकारी

गेल्या वर्षी मोदी सरकारने तीन कृषी कायद्यांमध्ये अचानक बदल केला. कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे काळे कायदे मोदी सरकारने मित्रपक्षाशी किंवा कोणाचाही सल्ला न घेता, संसदेत कोणतीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर रेटून नेले. उत्तरेतील अनेक राज्यांच्या शेतकऱ्यांनी या कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर सहा महिन्यांपासून आंदोलन चालू ठेवले आहे. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. अत्यंत कडाक्याच्या थंडीत दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले. देशाची संचित मत्ता विकून आत्मनिर्भरतेबाबत भाषणे देणारे मोदी सरकार हे आतापर्यंतच्या भारतातील सर्वांत आडमुठे आणि अहंकारी शासन आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून, त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षांत देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे केले, त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला नेला. सात वर्षांतील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस रविवारी राज्यभर आंदोलन करत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.   
 

Web Title: 'Modi government is the most arrogant and arrogant in the country till date', prithviraj chavan on modi sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.