रफाएल फायटर जेट विमानांच्या खरेदीत मोदी सरकारने वाचवले 12,600 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 12:25 PM2017-11-23T12:25:11+5:302017-11-23T12:30:47+5:30
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने रफाएल लढाऊ विमानांच्या खरेदी करारात मोठी बचत केली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने रफाएल लढाऊ विमानांच्या खरेदी करारात मोठी बचत केली आहे. भारत फ्रान्सच्या दासॉल्ट एव्हिएशनकडून उड्डाणवस्थेतील ३६ रफाएल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. हा करार करताना मोदी सरकारने 35 कोटी अमेरिकन डॉलर्सची बचत केली आहे. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र, देखभाल आणि प्रशिक्षणामध्येही 130 कोटी अमेरिकन डॉलर्सची बचत होणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने रफाएल विमानांच्या खरेदी करारावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपाप्रणीत एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर रफाएल विमान खरेदी करण्याच्या किंमतीमध्ये बेसुमार वाढ झाली तसेच करारात टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचाही समावेश नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या सर्व व्यवहाराशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले कि, प्रत्यक्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात या विमानांच्या खरेदीमध्ये 12,600 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
मोदी सरकार मूळ 526 कोटी किंमत असलेले रफाएल विमान 1,570 कोटींना विकत घेत आहे तसेच या संपूर्ण व्यवहाराची माहिती सुद्धा उपलब्ध करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. काँग्रेसच्या काळापासून रफाएल विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. भारतीय हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याने हा करार करण्यात आला.
संपुआच्या तुलनेत एनडीच्या कार्यकाळात हा करार अधिक यशस्वी ठरला असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या काळात उड्डाणवस्थेतील 18 विमाने मिळणार होती. पण एनडीएने या कराराचा फेरआढावा घेऊन चर्चा केली. त्यामध्ये उड्डाणवस्थेतील 36 विमाने देण्याचे दासॉल्टने मान्य केले तसेच फ्रान्सकडून मिटीयॉर क्षेपणास्त्रही मिळणार आहे ज्यामुळे ही विमानांची क्षमता अधिक वाढेल.