सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने पाठवले 94 कोटी ई-मेल
By admin | Published: June 4, 2016 05:22 PM2016-06-04T17:22:49+5:302016-06-04T17:25:29+5:30
मोदी सरकारने कामकाजांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी 94 कोटी ई-मेल्स पाठवले होते, जे अनेकांनी वाचून आपलं मत नोंदवलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 04 - केंद्र सरकारला सत्तेत दोन वर्ष पुर्ण झाल्यानंतर सरकारची लोकप्रियता कमी झाली की वाढली हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. मात्र मोदी सरकारच्या डिजीटल कार्यक्रमांमधील लोकांचा सहभाग वाढतो आहे हे स्पष्ट आहे. मोदी सरकारने कामकाजांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी 94 कोटी ई-मेल्स पाठवले होते, जे अनेकांनी वाचून आपलं मत नोंदवलं आहे. ई-मेल्स वाचणा-यांचा आकडा पाहता मोदी सरकारच्या डिजीटल कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिन्यात मुंबईत झालेल्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 46 हजार लोकांना धन्यवाद देणारा ईमेल पाठवण्यात आला होता. 96 टक्के लोकांनी हा ईमेल वाचला होता. मोदी सरकारने आतापर्यंत 217 ई-मेल कॅम्पेन केले असून हा सर्वात यशस्वी ठरला आहे.
मोदी सरकारने केलेल्या ई-मेल कॅम्पेन्सपैकी रिडरशिपच्या दृष्टीने पाहता सर्वात यशस्वी ठरलेले पाच ई-मेल कॅम्पेन्स या सहा महिन्यांमध्येच करण्यात आले. प्रत्येत ई-मेल कॅम्पेनला रिडरशिप वाढत असल्याचं दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मलेशिया आणि सिंगापूर दौ-याची माहिती देणारा तसंच लोकांना फॉलो करण्याचं आवाहन करणारे 74.16 लाख ईमेल पाठवण्यात आले होते. या ई-मेल्सना 12 टक्के रिडरशिप मिळाली होती. मात्र या कॅम्पेनला फॉलो करण्यासाठी देण्यात आलेल्या युआरएलवर 92 हजार लोकांनी क्लिक केलं होतं. जो आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे.