मोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 10:01 AM2018-04-23T10:01:20+5:302018-04-23T10:22:05+5:30
मोदी सरकारनं 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्यांसाठी मोदी केअरनंतर आता एक मोठी योजना आणणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितेशी संबंधित असलेल्या कामगार मंत्रालयाच्या अशा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली- मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्यांसाठी मोदी केअरनंतर आता आणखी एक मोठी योजना आणणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितेशी संबंधित असलेल्या कामगार मंत्रालयाच्या अशा योजनेसंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा कृषी क्षेत्रात काम करणा-या कामगारांनाही फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही मोदींनी ‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजने(आयुष्यमान भारत)ची घोषणा केली होती.
मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जात आहे. या नव्या योजनेंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबीयांना 5-5 लाखांचं विमा संरक्षण दिलं जाणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, अर्थ आणि कामगार मंत्रालय या योजनेवर बारकाईनं काम करत आहेत. याअंतर्गत पेन्शन(डेथ व डिसएबिलिटी) आणि मॅटरनिटी संरक्षणाबरोबरच मेडिकल, आजारपण आणि बेरोजगारांनाही संरक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील कनिष्ठ वर्गातील 40 टक्के कामगारांना या योजनेला लाभ पोहोचवण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची गरज आहे. उर्वरित 60 टक्के योजनेसाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मंत्रालयानं कामगार मंत्रालयाला 'सामाजिक संरक्षण सुरक्षा कवच' यावर भर देण्यास सांगितलं आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिका-यांच्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्थ मंत्रालयाचीही सहमती आहे. कामगार मंत्रालयाला वाटतं की, सरकारनं ही योजना हळूहळू सुरू करावी, तसेच सर्वात गरीब कुटुंबाला पहिल्यांदा संरक्षण द्यावं. या योजनेच्या सुरुवातीला कमी पैशांची गरज लागणार आहे. परंतु या योजनेचा विस्तार करण्यासाठी मोठी रक्कम उभारावी लागणार आहे.
कशी असेल योजना
सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना ही 10 वर्षांसाठी तीन टप्प्यांत लागू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व कामगारांना संरक्षण दिलं जाणार आहे. ज्यात आरोग्य सुरक्षितता आणि निवृत्तीनंतरच्या फायद्यांचा समावेश असणार आहे. तर दुस-या टप्प्यात बेरोजगारांना फायदा पोहोचवण्यात येणार आहे. तिस-या टप्प्यात दुस-या कल्याणकारी योजना सुरू केल्या जाऊ शकतात. 50 कोटी लाभार्थ्यांना चार स्तरांमध्ये विभागले जाईल. पहिल्या वर्गात दारिद्र्य रेषेखालील लोक असतील. ज्यांना काहीही भरपाई करावी लागणार नाही. याची भरपाई केंद्र सरकार सामान्यांकडून वसूल करण्यात येणा-या करामधून करणार आहे. दुस-या स्तरात अनुदानित योजनांचा समावेश असेल. तर तिस-या टप्प्यात कामगारांचा समावेश असणार आहे. चौथ्या स्तरात संपन्न कामगारांना ठेवण्यात येणार आहे.