पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एक दिलासा; कांद्याचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:34 AM2021-11-04T08:34:50+5:302021-11-04T08:55:56+5:30
ऐन दिवाळीत मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय; सर्वसामान्यांना मोठा दिलासा
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे काल अखेर मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल ५, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झालं आहे. इंधन आघाडीवर दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारनं कांद्यांचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात असलेल्या बाजारांमधील आपला बफर स्टॉक कमी केला आहे. त्यामुळे १.११ लाख टन कांदा आता बाजारात आला आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं किलोमागे ५ ते १२ रुपयांचा दिलासा मिळाला आहे. केंद्राकडे असलेला बफर स्टॉक मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, चंदिगढ, कोच्ची आणि रायपूर यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आणला गेला आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारांमध्येदेखील अधिकच्या कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
बफर स्टॉक बाजारात आणून कांद्याचे दर स्थिर करण्यात येत असल्याची माहिती ग्राहक मंत्रालयानं दिली आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा स्वस्त झाला आहे. कांद्याचा सध्याचा किरकोळ बाजारातील दर सरासरी ४०.१३ रुपये असून होलसेल बाजारात हाच दर ३१.१५ रुपये इतका आहे, अशी आकडेवारी मंत्रालयानं दिली.
मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधील १,११,३७६.१७ टन कांदा प्रमुख बाजारांमध्ये आणला गेला. त्यामुळे कांद्याच्या दरात किलोमागे ५ ते १२ रुपयांची घसरण झाली. उदा. मुंबईत १४ ऑक्टोबरला कांद्याचा दर ५० रुपये किलो होता. तो आता ४५ रुपयांवर आला आहे. दिल्लीत ४९ रुपयांना विकला जाणारा कांदा आता ४४ रुपये किलो दरानं मिळतो आहे.