मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 02:29 PM2020-01-12T14:29:34+5:302020-01-12T14:31:56+5:30
भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत आता आसामधील खासदार बदरुद्दीन अजमल यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सरकारच्या काळात मुस्लिमांसोबत मानवतेने वागवले जात नाही आहे. त्यांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मुस्लिमांना भारतीय नागरिक मानले जात नाही आहे, असा आरोप बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे.
बदरुद्दीन अजमल हे आसाममधील खासदार असून, ते एआययूडीएचे प्रमुख आहेत. सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनावर अजमल यांनी गंभीर टीका केली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेल्या दुजाभावाबद्दल ते म्हणाले की, ''तुम्ही उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागात सीएए विरोधात झालेल्य आंदोलनाच्या घटना पाहा. पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला जातो. मात्र नंतर त्यांची कसलीही चौकशी होत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले जाते. असे कौतुक करतानाचे भाजपा नेत्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.जे अत्यंत लाजिरवाणे आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. भाजपाने देश चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्यातरी देश त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उद्या देशाची सूत्रे अन्य कुणाच्या तरी ताब्यात असतील.''
''भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे हे धोरण फार काळ चालेल, असे मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनही त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.
''केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज ऐकून घेऊ इच्छित नाही. आपल्याकडे बहुमत आहे त्यामुळे आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र हा केवळ भ्रम आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि नागरिकत्व कायदा लागू करून लोकांनी घुसखोर ठरवू, असे त्यांना वाटते. मात्र हे सर्व काही फार काळ चालणार नाही, असा टोलाही अजमल यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस त्यांनीच विणलेल्या जाळ्यात फसतील, असेही ते म्हणाले.