मोदी सरकारच्या 'या' जबरदस्त प्लानमधून २० लाख तरुणांना रोजगार मिळणार; ४००० कोटींहून अधिक खर्च होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 09:46 PM2023-03-18T21:46:35+5:302023-03-18T21:47:55+5:30
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मित्र योजनेअंतर्गत ४,४४५ कोटी रुपये खर्चून मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली-
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मित्र योजनेअंतर्गत ४,४४५ कोटी रुपये खर्चून मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या मेगा पार्क्समधून देशभरात २० लाखाहून अधिक तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार प्राप्त होणार आहे. हे टेस्कटाईल पार्क तामीळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होणार आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या माहितीत मेगा टेक्सटाइल पार्क्समध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे ७०,००० कोटी रुपयांची देशी आणि विदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सात राज्यांमध्ये प्रधानमंत्री मित्र मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०२१ मध्ये पीएम मित्र योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आहे. तिचे पूर्ण नाव प्रधानमंत्री मेगा टेक्सटाईल इंटिग्रेटेड टेक्सटाईल आणि परिधान योजना असे आहे. या योजनेंतर्गत सात नवीन टेक्सटाईल पार्क बांधण्यात येणार आहेत. सरकारच्या मते, यामुळे वस्त्रोद्योग आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. या घोषणेमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे, असं गोयल म्हणाले.
उत्पादन आणि निर्यातीवर भर दिला जाणार
पीयूष गोयल यांच्या दाव्यानुसार हे पाऊल पीएम मोदींच्या 5F व्हिजनपासून प्रेरित आहे. या 5F व्हिजनमध्ये फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेनचा समावेश आहे. त्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. या योजनेमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात २१ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामध्ये ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष योजनांचा समावेश आहे. या योजनेमुळे उत्पादन आणि निर्यात-केंद्रित वाढ होईल. पीएम मित्र योजनेंतर्गत कताई, विणकाम, प्रक्रिया, डाईंग आणि छपाईपासून कपड्यांच्या निर्मितीपर्यंतचे काम एकाच ठिकाणी केले जाईल.