मुस्लिम मुलींना उच्चशिक्षणासाठी मोदी सरकार देणार 51 हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 10:07 AM2017-08-07T10:07:21+5:302017-08-07T10:09:44+5:30
देशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचं ध्येय गाठण्यासाठी प्रोस्ताहन द्यायला केंद्र सरकारकडून 51 हजार रूपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे
नवी दिल्ली, दि. 7- देशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचं ध्येय गाठण्यासाठी प्रोस्ताहन द्यायला केंद्र सरकारकडून 51 हजार रूपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.या मदतीला 'शादी शगुन' असं नाव देण्यात आलं आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनकडून मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एमएईएफनुसार,या नव्या योजनेचं ध्येय मुस्लिम मुलींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आहे.
नुकतंच अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएईएफच्या बैठकीत मुलींना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या संदर्भात काही निर्णय झाले. त्यामध्ये शादी शगुन योजनेचा नवा निर्णय झाला. तसंच नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना दहा हजार रूपयांची रक्कम दिली जाइल, असा निर्णयही या बैठकीत झाला आहे. सध्या अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना बारा हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात होती.
मुस्लिम समाजातील एका मोठ्या भागात आजही मुस्लीम मुलींना उच्च शिक्षण मिळत नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. आमचं ध्येय मुस्लिम मुलींना तसंच त्यांच्या पालकांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्याहन देण्याचं आहे. मुलींनी कमीत कमी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करावं हाच उद्देश डोळ्यासमोर आहे. त्यासाठी शादी शगुन या योजनेद्वारे 51 हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे, अशी माहिती एमएईएफचे कोषाध्यक्ष शाकिर हुसैन अन्सारी म्हणाले आहेत.
शादी शगुन या योजनेसाठी एक वेबसाइट तयार केली जात असून या वेबसाइटवर योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यातमध्ये उल्लेखनिय बाब म्हणजे, ज्यांनी शालेय शिक्षण घेताना एमएईएफकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळविली आहे अशा मुलींना शादी शगुनची ही किंमत पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास' या घोषणेला सत्यात उतरविण्याचं काम केलं आहे, असं अन्सारी म्हणाले आहेत. तसंच या योजनेला पूर्णत्वास आणल्याबद्दल त्यांनी मुख्तार अब्बास नखवी यांचेही आभार मानले आहेत.