मोदी सरकार देणार गायी-म्हशींनाही 'आधार'
By Admin | Published: January 5, 2017 09:18 PM2017-01-05T21:18:14+5:302017-01-05T21:18:14+5:30
केंद्र सरकार लवकरच गायी आणि म्हशींनाही आधार कार्ड देणार आहे. गायी-म्हशींची संख्या आणि दुधाच्या उत्पादन वाढीसाठी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - केंद्र सरकार लवकरच गायी आणि म्हशींनाही आधार कार्ड देणार आहे. गायी-म्हशींची संख्या आणि दुधाच्या उत्पादन वाढीसाठी दुग्धविकास मंत्रालयाने हा उपाय शोधल्याचं वृत्त आहे. जवळपास 1 लाख लोकं संपूर्ण देशात फिरून गायी-म्हशींवर टॅग लावतील. यासाठी 50 हजार मोबाईल टॅबलेटचंही वाटप करण्यात आलं आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी जवळपास 8 कोटी 80 लाख गायी-म्हशींच्या कानामध्ये युआयडी नंबर लावला जाईल. याद्वारे दुभत्या गायी-म्हशींची ओळख पटवणं सोप्पं होणार असून आयडी नंबरच्या सहाय्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणंही सहज शक्य होणार आहे. याद्वारे त्यांच्यावर लसीकरण , औषधोपचार वेळेवर करता येणार आहे. यामुळे 2022 पर्यंत दूध डेअरी असणा-या शेतक-यांची कमाई दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा टॅग बनवताना गायी-म्हशींच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. टॅग लावल्यानंतर त्या टॅगचा नंबर टॅबलेटच्या ऑनलाइन डेटाबेसमध्ये समाविष्ट केला जाईल. याशिवाय मालकाला एक हेल्थ कार्डदेखील दिलं जाणार असल्याचं वृत्त आहे.