योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:55 PM2024-10-16T17:55:37+5:302024-10-16T17:57:36+5:30

NSG Commando : सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटमध्ये विशेष प्रशिक्षित जवानांची नवीन बटालियन जोडण्यासही गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

Modi Government Withdraw NSG Commando VIP Security CRPF Take Charge | योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

नवी दिल्ली : सरकारने व्हीआयपी सुरक्षेसाठी असलेल्या नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (NSG) कमांडोना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 9 अतिमहत्त्वाच्या लोकांना व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या संरक्षणात एनएसजी कमांडो तैनात आहेत. आता पुढील महिन्यापासून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे (CRPF)सोपवली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी बुधवारी माहिती दिली. सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटमध्ये विशेष प्रशिक्षित जवानांची नवीन बटालियन जोडण्यासही गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

'या' नेत्यांच्या सुरक्षेसाठी सध्या एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (NSG) ब्लॅक कॅट कमांडो झेड प्लस श्रेणीतील नऊ व्हीआयपींमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा अध्यक्षा मायावती, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) अध्यक्ष फारुक अब्दुल्ला आणि आंध्र राज्याचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आहेत. यांना आता सीआरपीएफ जवानांची सुरक्षा दिली जाणार आहे.

सीआरपीएफमध्ये नवी बटालियन असणार
सीआरपीएफमध्ये सहा व्हीआयपी सुरक्षा बटालियन आहेत. या कामासाठी आणखी एक सातवी बटालियन सामील करण्यास सांगितले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत संसदेच्या सुरक्षेत कार्यरत असलेली ही नवी बटालियन असणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी संसदेतील सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर संसदेची सुरक्षा सीआरपीएफकडून सीआयएसएफकडे सोपवण्यात आली होती.

सीआरपीएफ एएसएल प्रोटोकॉल दिला जाईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कार्यभार स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश पोलिसांचे एक पथक नुकतेच आपल्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा एनएसजीवरून सीआरपीएफकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने दिल्लीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नऊपैकी दोन व्हीआयपींना सीआरपीएफने दिलेला प्रगत सुरक्षा संपर्क (एएसएल) प्रोटोकॉलही दिला जाईल. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा समावेश आहे. एएसएलमध्ये व्हीआयपीच्या आगामी दौऱ्याचे ठिकाण आधीच तपासले जाते. गृहमंत्री अमित शाह, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबातील तीन काँग्रेस नेत्यांसह देशातील पाच व्हीआयपींसाठी सीआरपीएफ अशा प्रोटोकॉलचे पालन करते.

Web Title: Modi Government Withdraw NSG Commando VIP Security CRPF Take Charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.