मोदी सरकारचे वागणे कुंभकर्णासारखे - सुप्रीम कोर्ट
By Admin | Published: October 10, 2014 10:37 AM2014-10-10T10:37:45+5:302014-10-10T10:37:52+5:30
पर्यावरणविषयक अहवाल सादर करण्यास दिरंगाई करणा-या मोदी सरकारला तुम्ही कुंभकर्णासारखे वागत आहात अशा शद्बात सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - प्रशासकीय कामकाज वेगवान करण्याची ग्वाही देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने गुरुवारी खडे बोल सुनावले आहेत. अहवाल सादर करण्यास दिरंगाई करणा-या केंद्र सरकारला तुम्ही कुंभकर्णासारखे वागत आहात अशा शद्बात सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे.
उत्तराखंडमधील अलकनंदा व भागीरथी या नद्यांवरील हायड्रोइलेक्ट्रीक प्रकल्पांविषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. या प्रकल्पांमुळे नद्यांमधील जैवविविधतेवर होणारे परिणाम याविषयी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला दोन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यानंतरही अहवाल सादर न केल्याने न्या. दीपक मिश्रा व आर.एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारची खरडपट्टीच केली. 'आज आमच्यासमोर अहवाल पाहिजे होता. तुम्ही (केंद्र सरकार) कुंभकर्णासाराखे वागत असून केंद्र सरकारने आज अहवाल का सादर केला नाही हेच आम्हाला समजत नाही, तुम्हाला नेमकं काय हवंय ? असा सवाल खंडपीठाने केंद्र सरकारला विचारला. तुम्ही रिप वॅन विंकल सारखेच आहात अशी टिप्पणीही कोर्टाने केली. रिप वॅन विंकल हे १९ व्या दशकाच्या इंग्रजी कथांमधील सर्वात कामचुकार पात्र म्हणून ओळखले जाते.