गरीबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता 30 सप्टेंबरपर्यंत घेता येणार 'या' योजनेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:39 PM2022-03-26T19:39:42+5:302022-03-26T19:40:37+5:30
PM Garib Kalyan Ann Yojana : अशा बैठका साधारणपणे बुधवारी होतात. मात्र शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. दुपारी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. अशा बैठका साधारणपणे बुधवारी होतात. मात्र शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत घेण्यात आला असा निर्णय -
या मंत्रिमंडळ बैठकीत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय मोदी मंत्रिमंडळात घेण्यात आला. ही योजना ३१ मार्चला संपणार होती.
सरकारनं कोरोना काळात सुरू केली होती ही योजना -
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने ही योजना (PMGKAY) सुरू केली होती. यासाठी मोदी सरकारने १.७० कोटींची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य मिळत आले आहे.
३१ मार्चपासून काँग्रेसचं 'महागाईमुक्त भारत अभियान' -
देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे. या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे.
महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधातील आंदोलनात राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला म्हणाले, इंधनाच्या सततच्या लुटीमुळे सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होत आहेत. पण सरकारला याची पर्वा नाही. पाच दिवसांत आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यावरून आज काँग्रेसने भाजप सरकारवर हल्ला चढवला.