जम्मूतल्या नेत्यांची नजरकैद संपुष्टात, गांधी जयंतीलाच मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 10:46 AM2019-10-02T10:46:54+5:302019-10-02T10:47:12+5:30
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जम्मू-काश्मीर प्रशासनानं जम्मूतल्या काही नेत्यांची नजरकैद संपुष्टात आणली आहे.
जम्मूः महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जम्मू-काश्मीर प्रशासनानं जम्मूतल्या काही नेत्यांची नजरकैद संपुष्टात आणली आहे. कलम 370 हटवल्यानंतर स्थानिक पोलिसांनी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जम्मूतल्या अनेक नेत्यांना नजरकैद केलं होतं. माजी मंत्री आणि डोगरा स्वाभिमान संघटनेचे पक्षाध्यक्ष चौधरी लाल सिंह यांना नजरकैद केलं होतं. जम्मूतल्या सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नजरकैद हटवण्यात आली आहे. ज्या नेत्यांवरून नजरकैद हटवण्यात आली आहे, त्यात नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, पँथर्स पार्टीच्या नेत्यांचा समावेश आहे.
चौधरी लाल सिंह यांच्याशिवाय ज्या नेत्यांवरून नजरकैद हटवण्यात आली आहे, त्यात नॅशनल कॉन्फरन्सचे देवेंद्र राणा आणि एसएस सालाथिया, काँग्रेसच्या रमन भल्ला आणि पँथर्स पार्टीचे हर्षदेव सिंह यांच्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांना 5 ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फ्ररन्सच्या खासदारांना फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, भेट झाल्यानंतर निर्बंधामुळे खासदारांना मीडियासोबत बातचीत करता आली नाही.