आर्थिक सुधारणांच्या बाबतीत मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय- चीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 10:22 PM2018-08-02T22:22:12+5:302018-08-02T22:22:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येऊन चार वर्षं झाली आहेत. अशातच मोदींच्या कामगिरीची कोणीही समीक्षा केलेली नाही
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येऊन चार वर्षं झाली आहेत. अशातच मोदींच्या कामगिरीची कोणीही समीक्षा केलेली नाही. परंतु चिनी मीडियानं मोदी सरकारवर आर्थिक सुधारणांमध्ये कौतुकास्तपद कामगिरी केल्याचं सांगत स्तुतिसुमनं उधळली आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून आर्थिक सुधारणांमध्ये मोदी सरकारनं उल्लेखनीय कामगिरी केल्याचं म्हटलं आहे.
गुरुवारी छापण्यात आलेल्या लेखात चीनकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. आर्थिक विकास आणि भारतातल्या अनेक राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपानं मिळवलेल्या शानदार विजयाचे नरेंद्र मोदीच शिल्पकार आहेत. मोदींना आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली नेत्यांमध्ये स्थान देण्यात आलं आहे. परंतु काही वादग्रस्त प्रकरणं त्यांच्या पाठलाग सोडत नाहीयेत.
नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशनच्या आंतरराष्ट्रीय कोऑपरेशन सेंटरचे असोसिएट रिसर्चर माओ किजी म्हणाले, चार वर्षांनंतरही असं विचारलं जातंय की मोदी भारतासाठी चांगले आहेत का ?, त्यातच विरोधकांनीही मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखात नोबल पुरस्कार विजेते आणि अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सेन यांनी 'भारत आणि त्याचा विरोधाभास' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी वातावरण खराब होत असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकार येण्याआधीच काही गोष्टी बिघडलेल्या होत्या.
आम्ही शिक्षा आणि आरोग्य क्षेत्रात पुरेसं काम केलेलं नाही. 2014नंतर या क्षेत्रांमध्ये आपण चुकीच्या दिशेनं पुढे चाललो आहोत, अमर्त्य सेन यांनी केलेल्या या विधानांचाही उल्लेख ग्लोबल टाइम्सनं केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधित झालेले वाद हे राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक आहेत. तसेच हिंदुत्वाचा अजेंडा राबवणारा नेता अशीही मोदींची प्रतिमा तयार झाली आहे. परंतु आर्थिक सुधारणांच्या बाबतीपेक्षा हे मुद्दे जास्त महत्त्वाचे नसल्याचंही ग्लोबल टाइम्सनं अधोरेखित केलं आहे. भारताला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मोदींनी मोठ्या सुधारणा करण्याची गरज असल्याचं मतही चिनी मीडियानं मांडलं आहे.