सामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलेंडरवर मिळणार 300 रुपयांची सबसिडी; मोदी सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:51 PM2023-10-04T15:51:15+5:302023-10-04T15:51:39+5:30
Modi Govt Cabinet Decison: दिवाळीपूर्वी मोदी सरकारने सामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे.
LPG Cylinder Subsidy: दिवाळीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान(सबसिडी) 200 रुपयांवरुन 300 रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत घेतला. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. आज ही रक्कम 200 रुपयांवरुन 300 रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही LPG सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी केली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला. पण, आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना फक्त 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.
The government has raised subsidy amount for Pradhan Mantri Ujjwala Yojana beneficiaries from Rs 200 to Rs 300 per LPG cylinder: Union minister Anurag Thakur during a briefing on Cabinet decisions pic.twitter.com/Dvf7wXtXQT
— ANI (@ANI) October 4, 2023
यावेळी अनुराग ठाकूर यांनी इतर निर्णयांचीही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. 8400 कोटी रुपयांच्या हळदीच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, उत्तर कोळसा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2400 कोटी रुपये खर्च केले जातील. बिहारमधील औरंगाबाद, गया, गढवा आणि झारखंडमधील पलामूला याचा फायदा होणार आहे. तेलंगणात वनदेवतेच्या नावाने केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ 889 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे.